India vs england 3rd Test | इंग्लंडचा टीम इंडियावर डाव आणि 76 धावाने विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

 इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.  

Updated: Aug 28, 2021, 06:06 PM IST
India vs england 3rd Test | इंग्लंडचा टीम इंडियावर डाव आणि 76 धावाने विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी title=

हेडिंग्ले : इंग्लंडने टीम इंडियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात (India vs england 3rd test) चौथ्या दिवशी डाव आणि 76 धावाने पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 91 धावा केल्या. तर सलामीवीर रोहित शर्माने 59 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने 55 धावा केल्या. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या तर क्रेग ओवरटनने 3 विकेट्स घेत रॉबिन्सनला चांगली साथ दिली. (India vs england 3rd test 4th day england beat team india by innings and 76 runs)  

चौथ्या दिवशीच काम तमाम....

इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 432 धावा केल्या. प्रत्युतरादाखल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 215 धावा केल्या होत्या. टीम इंडिया 139 धावांनी पिछाडीवर होती. मात्र विराट कोहली 45 तर चेतेश्वर पुजारा 91 धावांवर नाबाद होते. दोघेही सेट झाले होते. त्यामुळे चौथ्या दिवशी या जोडीकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र चौथ्या दिवसाची सुरुवात निराशाजनक झाली. पुजारा आला तसाच परत गेला. पुजारा नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. पुजारा 91 धावा करुन बाद झाला.

रॉबिन्सची 'फाईव्ह स्टार' कामगिरी

पुजारा बाद झाल्यानंतर टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट्स टाकल्या. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. विराट 55 धावा करुन तंबूत परतला. तर त्यानंतर एकानेही  डाव सावरण्याचा प्रयत्न केला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताने 8 विकेट्स गमावल्या.   टीम इंडियाचा डाव 278 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडचा डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला. ओली रॉबिन्सनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.  

इंग्लंडचा धावांचा डोंगर 

इंग्लंडने पहिल्या डावात ऑल आऊट 432 धावा केल्या. कर्णधार जो रुटने सर्वाधिक 121 धावांची शतकी खेळी केली. तर रॉरी बर्न्स, हसीब हमीद आणि डेव्हीड मलान या तिकडीने अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराज या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात निराशा

दरम्यान टीम इंडियाने टॉस जिंकल्यानंतर पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. विराटने घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरला. टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यास शक्य झाले. दरम्यान इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. मालिकेतील चौथा सामना हा 2 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.