India vs New Zealand 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी मैदानावर तळ ठोकत भारताला विजयापासून दूर ठेवलं. भारताला या सामन्यात बरोबरीत समाधान मानावं लागलं.
आता भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर रंगणार आहे. तब्बल पाच वर्षांननंतर मुंबईत कसोटी सामना खेळवला जात आहे. 2016 साली भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान वानखेडे स्टेडिअमवर अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता.
पण हा सामना होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.
पावसामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. पावसामुळे आज दोन्ही संघांना इनडोअर सराव करावा लागला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे टॉस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. असं असली तरी पुढचे चार दिवस हवामान चांगलं राहण्याची अपेक्षा आहे.
दोन्ही संघात होणार बदल?
या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंना संधी देऊ शकतं. न्यूझीलंडच्या संघातही या सामन्यात विल्यम समोरविलेच्या जागी नील वॅग्नरला खेळवू शकतो.