'सुपर' विजयाचा शिल्पकार रोहितचा 'मराठी बाणा' !

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला.

Updated: Jan 29, 2020, 07:49 PM IST
'सुपर' विजयाचा शिल्पकार रोहितचा 'मराठी बाणा' ! title=

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला. सुपर ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलमध्ये भारताला विजयासाठी १० रनची गरज होती. अखेर रोहित शर्माने शेवटच्या दोन्ही बॉलवर सिक्स मारून भारताला जिंकवून दिलं. त्याआधी रोहित शर्माने ४० बॉलमध्ये ६५ रनची खेळी केली होती. या कामगिरीबद्दल रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने मराठीमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली. क्रीडा समिक्षक सुनंदन लेले यांनी रोहितला मराठीमध्ये प्रश्न विचारले. 

'सुपर ओव्हरमध्ये आव्हानाचा पाठलाग करत असताना बॉलर जास्त दबावात असतो. बॅटिंगला गेलो तेव्हा क्रीजमध्ये हलू का स्थिर राहू? असे विचार मनात येत होते. बॉलरला चूक करु दे, मी क्रीजमध्ये स्थिर राहणार, असं ठरवलं. बॉल माझ्या पट्ट्यात आला आणि मी मारला,' असं रोहित म्हणाला.

'केन विलियमसनने जबरदस्त खेळी केली, तरी न्यूझीलंडचा पराभव झाला, त्यामुळे त्यांना वाईट वाटलंच असेल. आम्ही मॅचमध्ये पुनरागमन केलं. मोहम्मद शमीची शेवटची ओव्हर आमच्यासाठी भरपूर महत्त्वाची होती. असा सामना वर्ल्ड कपमध्येही येऊ शकतो. तुम्हाला सकारात्मक राहावं लागेल,' असं रोहितने सांगितलं.