Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी

India vs Pakistan Asia Cup 2023 Match: मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आलेले हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात अनेक वर्षानंतर एकमेकांविरोधात खेळणार आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 2, 2023, 10:04 AM IST
Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी title=
आज कॅण्डीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना

Kandy Sri Lanka Weather Report: भारत आणि पाकिस्तानचा संघ जेव्हा आमने-सामने असतो तेव्हा ती क्रिकेटचाहत्यांसाठी पर्वणीच असते. खेळाडूच काय तर चाहत्यांच्या हृदयाची धडधडही वाढवणारे हे सामने कायमच चर्चेचा विषय असतात. आज पुन्हा एकदा अशीच धडधड वाढणारा सामना खेळवला जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेमध्ये आज श्रीलंकेतील कॅण्डी येथे एकदिवसीय सामना होणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उभे ठाकतील. वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र सामन्याचं भविष्य कॅण्डीमधील वातावरणावर अवलंबून आहे. आज मुंबईसहीत उपनगरांमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईवर ढगांची चादर परसली आहे. त्यामुळेच आज श्रीलंकेतही पाऊस पडणार का? कॅण्डीच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडणार की सामना खऱ्या पावसाने धुतला जाणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. 

पाऊस पडणारच

मुंबईप्रमाणेच कॅण्डीमध्येही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एक्यूवेदर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणि शनिवारी कॅण्डीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी या ठिकाणी पाऊस झाला सुद्धा. शनिवारी दिवसभर कॅण्डी शहरावर ढगांची चादर असेल. या ठिकाणी शनिवारी 10 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

6 तास पावसाची शक्यता

भारत आणि पाकिस्तानचा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. मात्र याचवेळी कॅण्डीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडेलच. शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच 6 तास पाऊस पडला तर सामना अगदी छोट्या फॉरमॅटमध्ये खेळवावा लागेल. 

पाकिस्तान थेट सुपर-4 मध्ये

आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचे गट फेरीतील दोन्ही सामना कॅण्डीमध्ये खेळवले जातील. पहिला सामना आज होत असून दुसरा सामना नेपाळविरुद्ध आहे. नेपाळविरुद्धचा सामना 4 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही सामन्यांना पावसाचा फटका बसू शकतो, असा अंदाज आहे. गटफेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळेच सामन्याचा निकाल लावण्याइतक्या षटकांचाही खेळ पावसामुळे झाला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून दिला जाईल. पाकिस्तानने नेपाळच्या संघाला 238 धावांनी पराभूत केलं आहे. या मोठ्या विजयासहीत त्यांनी सुपर-4 मध्ये आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. आजच्या सामन्यात पाऊस पडला तर मैदानात न उतरताच पाकिस्तान थेट सुपर-4 मध्ये पोहचेल. असं झाल्यास भारताला नेपाळविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल.