जोहान्सबर्ग : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील चौथा एकदिवसीय सामना जोहान्सबर्गमध्ये रंगणार आहे.
सहा एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत भारताने ३-० अशी आघाडी घेतलीय. त्यामुळे चौथा एकदिवसीय सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाचा इतिहास रचण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. भारताकडून कर्णधार कोहली, शिखर धवन तुफान फॉर्मात आहेत. शिवाय चहल आणि कुलदीपच्या फिरकीपुढे आफ्रिकन फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातलंय.
दुसरीकडे पराभव आणि दुखापतीने ग्रासलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याचं संघात पुनरागमन झालंय. त्यामुळे एबीच्या संघातील पुनरागमनामुळे दक्षिण आफ्रिकेची कामगिरी सुधारणार का याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात.
चौथा एकदिवसीय सामना आणखी एका कारणासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा आहे. स्तनाचा कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना गुलाबी कपड्यांमध्ये खेळणार आहे.