भारत-वेस्ट इंडिज टेस्ट उद्यापासून, पुजारा-रहाणे ७ महिन्यांनी मैदानात

वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आता वेस्ट इंडिजिविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

Updated: Aug 21, 2019, 08:29 PM IST
भारत-वेस्ट इंडिज टेस्ट उद्यापासून, पुजारा-रहाणे ७ महिन्यांनी मैदानात title=

एंटिगा : वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आता वेस्ट इंडिजिविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. २२ ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. या मॅचपासून दोन्ही टीमच्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात होईल. भारतीय टीम ही सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आपली क्रमवारी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे ७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. वेस्ट इंडिज ए विरुद्ध या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. टेस्ट सीरिजमध्येही या दोघांकडून अशाच कामगिरीची कर्णधार विराट कोहलीला अपेक्षा असेल.

कर्णधार विराट कोहलीही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या दोन वनडेमध्ये कोहलीने शतकं लगावली. टेस्टमध्ये विराटने आणखी एक शतक केलं तर तो कर्णधार म्हणून शतक करणाऱ्या रिकी पाँटिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. कर्णधार म्हणून विराटने १८ टेस्ट शतकं केली आहेत. कर्णधार असताना पाँटिंगच्या नावावर १९ टेस्ट शतकं आहेत.

बॉलिंगसाठी टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांचा पर्याय आहे. अश्विनने याच मैदानात २०१६ साली ७ विकेट घेतल्या आणि एक शतकही लगावलं होतं.

तर दुसरीकडे वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या मागच्या टेस्ट सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने जानेवारी २०१८ पासून आत्तापर्यंत ५६५ रन केले आणि ४० विकेट घेतल्या.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, ऋद्धीमान सहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

वेस्ट इंडिज 

जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डाऊरिच, शॅनन गॅब्रियल, शिमरोन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच