'मी फार पूर्वीच ठरवलं होतं की...', WC मधून वगळल्यानंतर अश्विनने मांडलं रोखठोक मत, म्हणाला 'काय अपेक्षा आहेत?'

आशिया कप आणि वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने गोलंदाजांची निवड करताना काही आश्चर्याचे धक्के दिले आहेत. अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.   

शिवराज यादव | Updated: Sep 15, 2023, 12:36 PM IST
'मी फार पूर्वीच ठरवलं होतं की...', WC मधून वगळल्यानंतर अश्विनने मांडलं रोखठोक मत, म्हणाला 'काय अपेक्षा आहेत?' title=

सध्या क्रिकेटरसिकांचं लक्ष लागून असलेल्या आशिया कप आणि आगामी वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय व्यवस्थापनाने संघाची घोषणा केली असून, फिरकी गोलंदांजांची निवड करताना काही आश्चर्याचे धक्के दिले आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाने रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव अशा तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना संघात जागा दिली आहे. तर दुसरीकडे अनुभवी आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना मात्र संघातून वगळण्यात आलं आहे. यानंतर अनेक माजी खेळाडूंनी आर अश्विनला संघात स्थान देणं भारतीय संघाच्या दृष्टीने जास्त फायद्याचं ठरलं असतं असं म्हटलं आहे. यादरम्यान, आता आर अश्विनने यावर प्रतिक्रिया दिली असून, संघ निवडीचं समर्थन केलं आहे. तसंच संघ जेव्हा कधी आपल्याला बोलावेल तेव्हा मी तयार असेन असंही सांगितलं आहे. 

"माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये यश आणि अपयशाचा समान वाटा आहे. माझ्या मनावर मी भारतीय क्रिकेट कोरलं आहे. जर संघाला माझ्या सेवेची गरज लागली तर मी माझे 100 टक्के देण्यास तयार असेन," असं आर अश्विनने म्हटलं आहे.

दरम्यान सध्या सुरु असलेल्या आशिय कपमध्ये कुलदीप यादव जबरदस्त कामगिरी करत आहे. तसंच रवींद्र जाडेजाही आपल्या अनुभवाचा फायदा उचलताना दिसत आहे. पण या दोघांशी तुलना करता अक्षर पटेल मात्र सध्या लयीत दिसत नाही. आर अश्विनने अक्षर पटेलची बाजू घेत त्याला थोडा वेळ दिला पाहिजे असं म्हटलं आहे. 

"सध्याच्या घडीला आपण अक्षर पटेलकडून फार अपेक्षा करत आहोत. मला वाटतं आपण त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. तर तुमच्याकडे अक्षर नसेल तर त्याची भूमिका कोण निभावणार? शार्दूल...तुम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? 5 ते 6 आणि कधीतरी 8 ओव्हर्स टाकत 2 ते 3 विकेट घेणं अपेक्षित आहे का?," अशी विचारणा आर अश्विनने केली आहे.

"अक्षर पटेल नेहमी 10 ओव्हर्स टाकू शकतो का? कदाचित नाही. जेव्हा ओव्हर्सची संख्या कमी होते तेव्हा तो कदाचित इच्छा नसेल तिथे चेंडू टाकेल. पण जर त्याला जास्तीत जास्त ओव्हर्स मिळाल्या तर त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो सेटही होईल," असं आर अश्विनने सांगितलं आहे. 

दरम्यान यावेळी अश्विनला वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने वाईट वाटलं का? असं विचारण्यात आलं असता उत्तर दिलं की, "मी तसा विचार करत नाही. कारण संघनिवड हे माझं काम नाही".

"मी फार पूर्वीच ठरवलं होतं की, ज्या गोष्टी माझ्या हातात नाही त्याचा मी फार विचार करणार नाही. आयुष्य आणि क्रिकेटच्या बाबतीत मी नेहमीच विचार करताना नकारात्मक गोष्टी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो," असं आर अश्विनने म्हटलं.

आपण कोणतंही काम अपूर्ण ठेवण्यावर विश्वास ठेवत नाही असं 36 वर्षीय आर अश्विनने सांगितलं आहे. तसंच आपण संघात नसलो तरी भारताने वर्ल्डकप जिंकताना मला पाहायचं आहे अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. "मी प्रत्येक दिवस जगत असतो. मी कोणतंही काम अपूर्ण ठेवत नाही. पण मी खेळत नसलो तरी भारताने पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकताना मला पाहायचं आहे," असं आर अश्विनने सांगितलं.