India Head Coach Gautam Gambhir Demands: भारताचा माजी सलामीवर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरने नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुलाखत दिली आहे. गंभीरची मुलाखतीची पहिली फेरी क्रिकेट सल्लागार समितीने झूम कॉलच्या माध्यमातून घेतल्यानंतर गंभीरने मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. प्रशिक्षकपद स्वीकारण्याआधी गंभीरने 2 महत्त्वाच्या अटी बीसीसीआय व्यवस्थापनासमोर ठेवल्याची माहिती हाती येत आहे. या मागण्या फारच आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असल्याचं समजतं.
'आयएनएनएस' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षकपदासंदर्भात बीसीसआयशी चर्चेदरम्यान गंभीरने आपण प्रशिक्षक झाल्यास आपल्याला संघावर पूर्ण नियंत्रण (फुल कंट्रोल) हवं आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे. इतकच नाही तर व्हाइट बॉल क्रिकेट म्हणजेच मर्यादित षटकांचं क्रिकेट आणि रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे संघ असतील, असंही गंभीरने म्हटलं आहे. गंभीरने केलेल्या मागण्या या प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण दिसत आहे. मात्र असं असलं तरी क्रिकेट बोर्डाने आधीच गंभीरच्या मागण्या मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील काही दिवसांमध्ये प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या नावाची घोषणा केली जाईल असं सांगितलं जात आहे. आजही मुंबईमध्ये यासंदर्भातील चर्चेसाठी बीसीसीआय आणि क्रिकेट वर्तुळातील तज्ज्ञांची बैठक होणार असल्याचे समजते.
भारताचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या शेवटपर्यंत वाढवण्यात आला आहे. द्रविडनंतर गंभीर भारतीय संघाचं प्रशिक्षकपदी रुजू होईल असं सांगितलं जात आहे. राहुलची प्रशिक्षक म्हणून कामगिरी उत्तम राहिली आहे. भारतीय संघ आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये उपविजेता राहिला आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या प्रशिक्षक-कर्णधारपदाची जोडी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दिर्घकाळ लक्षात राहील अशी कामगिरी या दोघांनी केली आहे.
नक्की वाचा >> India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..
गौतम गंभीरबरोबर भारताचे माजी सलामीवीर डब्लू. व्ही. रमण या दोघांनीच भारतीय प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. दोघांचीही प्रत्येकी 40 मिनिटं मुलाखत घेण्यात आली. क्रिकेट सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. भारताच्या या दोन्ही माजी सलामीवीरांनी समितीला समाधानकारक उत्तरं दिली. ही मुलाखत घेण्याचं काम अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुल्केशना नाईक यांनी केलं. झूम कॉलवरुन या मुलाखती पार पडल्या. गंभीर आणि रमण या दोघांनीही डिजीटल माध्यमातून मुलाखतीला प्राधान्य दिल्याने ही विशेष मूभा देण्यात आलेली.