वेलिंग्टन : स्मृती मंधनाच्या आक्रमक खेळीनंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये स्मृती मंधनानं २४ बॉलमध्ये तिचं अर्धशतक पूर्ण केलं. एवढ्या जलद अर्धशतक करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. अमिलिया केरनं स्मृती मंधनाला ५८ रनवर आऊट केलं. यावेळी भारताचा स्कोअर १०२/२ एवढा होता आणि विजयासाठी आणखी ५८ रनची गरज होती. तरी भारताचा या मॅचमध्ये २३ रननी पराभव झाला.
स्मृती मंधनानं तिच्या ३४ बॉलमध्ये केलेल्या ५८ रनच्या खेळीमध्ये ३ फोर आणि ७ सिक्स मारल्या. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला १५९ रनमध्ये रोखलं. २० ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं ४ विकेट गमावल्या. अरुंधती रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही स्मृती मंधनानं मॅच जिंकवून देणाऱ्या खेळी केल्या होत्या. या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला होता. स्मृतीनं पहिल्या दोन सामन्यात तिचं चौथं वनडे शतक आणि नाबाद ९० रनची खेळी केली होती. या कामगिरीमुळे स्मृती आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
न्यूझीलंडची फास्ट बॉलर ली तहाहूनं ४ ओव्हरमध्ये भारताच्या ३ खेळाडूंना आऊट केलं. १९.१ ओव्हरमध्ये भारताचा १३६ रनवर ऑल आऊट झाला. अमिलिया केरनं २८ रन देऊन भारताच्या २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या. यामध्ये स्मृती मंधना आणि हरमनप्रीत कौरचा समावेश होता. ऑफ स्पिनर लिघ कॅसपेरेक हिनंही भारताच्या २ विकेट घेतल्या.
या पराभवानंतर हरमनप्रीत म्हणाली 'शेवटच्या १० ओव्हरमध्ये खेळाडूंनी खराब बॅटिंग केली. शेवटच्या १० ओव्हरमध्ये आम्ही नेहमीच संघर्ष करतोय'. या मॅचमध्ये भारतानं वनडे टीमची कर्णधार मिताली राजला संधी दिली नाही. यावरही हरमनप्रीतनं प्रतिक्रिया दिली. 'युवा खेळाडूंना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच कारणासाठी मिताली टीममध्ये नाही.' टी-२० सीरिजची दुसरी मॅच शुक्रवारी ऑकलंडमध्ये खेळवली जाईल.
या पराभवानंतर स्मृती मंधना म्हणाली 'मला २० ओव्हरपर्यंत बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे. कारण सुरुवातीच्या तीन-चार बॅट्समननी १८-२० ओव्हरपर्यंत बॅटिंग केली तर पडझड होणार नाही. माझी आणि जेमिमाहची विकेट गेल्यामुळे आम्हाला सामना गमवावा लागला. पुढच्या वेळी आम्हाला चांगली योजना आखावी लागेल आणि त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करावी लागेल'.
'भारताच्या बॉलरनी १०-१५ रन जास्त दिल्या. पण बॅटिंग करताना आम्ही हे लक्ष्य प्रती ओव्हर ७ रनच्या खाली आणलं होतं, त्यामुळे आम्हाला या आव्हानाचा पाठलाग करता यायला पाहिजे होता', अशी कबुली स्मृती मंधनानं दिली.