विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. आता या वनडे सीरिजची दुसरी वनडे उद्या विशाखापट्टणममध्ये खेळवली जाणार आहे. भारतासाठी ही मॅच करो या मरो आहे. ३ वनडे मॅचची ही सीरिज जिंकायची असेल, तर भारताला उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. दुसऱ्या वनडे मॅचआधी भारतीय टीमने जोरदार सराव केला. या सरावासाठी जसप्रीत बुमराहही भारतीय टीमसोबत आला होता.
बुमराहने भारताकडून शेवटची मॅच २ सप्टेंबरला खेळली होती. यानंतर तो पहिल्यांदाच भारतीय टीमसोबत दिसला. बीसीसीआय़ने बुमराहचा सराव करतानाचा फोटो ट्विट केला. रोहित, विराट आणि कंपनीला स्पेशल नेट बॉलर मिळाला, असं ट्विट मुंबई इंडियन्सने केलं.
Look who's here pic.twitter.com/Ex7aknjDBn
— BCCI (@BCCI) December 17, 2019
जसप्रीत बुमराह किती फिट आहे, हे पाहण्यासाठी टीम प्रशासनाने बुमराहला विशाखापट्टणमला बोलावलं आहे. सप्टेंबर महिन्यात बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर आता बुमराहचं रिहॅबिलिटेशन सुरु आहे. बुमराहने नेटमध्ये भारतीय बॅट्समनना बॉलिंग केली.
जसप्रीत बुमराह पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधून भारतीय टीममध्ये पुनरागमन करेल, अशी शक्यता आहे. भारतीय टीम जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजच्याआधी भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-२० मॅचही होणार आहेत.