बंगळुरू : बंगळुरूने यंदाच्या आयपीएल मोसमातली आपली निराशाजनक कामगिरी सुरुच ठेवली आहे. दिल्लीने बंगळुरूचा ६ विकेटने पराभव केला आहे. या पराभवामुळे यंदाच्या पर्वातील बंगळुरूचा हा सलग ६ वा पराभव ठरला आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या १५० रनचे आव्हान दिल्लीने ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीने विजयी आकडा ७ बॉल शिल्लक ठेवत गाठला. दिल्लीचा हा यंदाच्या मोसमातला तिसरा विजय ठरला आहे. दिल्लीची टीम ६ पॉईंटसह अंकतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. बंगळुरुच्या सलग ६ व्या पराभवामुळे आयपीएलच्या या पर्वातील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्ठात आले आहे.
दिल्लीकडून मुंबईकर श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. त्याने ६७ रन केल्या. तर पृथ्वी शॉ आणि कॉलीन इंग्राम यांनी अनुक्रमे २८ आणि २२ रनची खेळी उभारली. बंगळुरुकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने २ तर टीम साऊथी, पवन नेगी, मोहम्मद सिराज आणि मोईन अली या चौकडीने प्रत्येकी १ विकेट मिळवली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची सुरुवात वाईट झाली. शिखर धवन भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६८ रन जोडले. पृथ्वीच्या रुपात दिल्लीने दुसरी विकेट गमावली. पृथ्वीने २८ रन केल्या.
याआधी टॉ़स जिंकून दिल्लीने बंगळुरूला बॅटिंगसाठी आंमत्रित केले. बंगळुरु टीमने आज नवी जर्सी परिधान केली होती. बंगळुरूकडे विस्फोटक खेळाडू असून देखील त्यांना सातत्याने मोठी खेळी करण्यास आजच्या मॅचमध्ये पण अपयश आले. बंगळुरूकडून विराट कोहलीने ४१ रनची खेळी केली. त्याला चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्याला या खेळीचे मोठ्या स्कोअर मध्ये रुपांतर करता आले नाही.
कोहलीनंतर मोईन अलीने सर्वाधिक ३२ रन केल्या. एबी डिव्हिलियर्सला आज आपल्या बॅटने कमाल दाखवता आली नाही. बंगळुरूने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने ४ विकेट घेतल्या. क्रिस मॉरीसने २ तर अक्षर पटेल आणि संदीपने १ विकेट घेतली.