IPL 2019: चेन्नईकडून दिल्लीचा दारुण पराभव, पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला आहे.

Updated: May 1, 2019, 11:38 PM IST
IPL 2019: चेन्नईकडून दिल्लीचा दारुण पराभव, पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल title=

चेन्नई : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयाबरोबरच चेन्नईने पॉईंट्स टेबलमध्ये आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. चेन्नईने ठेवलेल्या १८० रनचा पाठलाग करताना दिल्लीची टीम फक्त ९९ रनवर ऑल आऊट झाली. चेन्नईचा लेग स्पिनर इमरान ताहिरने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजाला ३ विकेट मिळाल्या. दीपक चहर आणि हरभजन सिंगला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

चेन्नईने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरला ४ रनवर पृथ्वी शॉ आऊट झाला. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरायला सुरुवात केली, पण स्कोअरबोर्डवर ५२ रन झाल्यावर शिखर धवन आऊट झाला. यानंतर दिल्लीला वारंवार धक्के बसतच गेले.

या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या बॉलरनी पहिल्या १० ओव्हरमध्ये चेन्नईच्या बॅट्समनना रोखून धरलं होतं. पण सुरेश रैनाचं अर्धशतक, धोनी आणि जडेजाची फटकेबाजी यामुळे चेन्नईला २० ओव्हरमध्ये १७९ रनपर्यंत मजल मारता आली. सुरेश रैनाने ३७ बॉलमध्ये ५९ रन केले, तर धोनीने २२ बॉलमध्ये नाबाद ४४ रन केले. रवींद्र जडेजानेही १० बॉलमध्ये २५ रनची खेळी करून टीमला मोठा स्कोअर करायला मदत केली. दिल्लीकडून जगदीश सुचितने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर क्रिस मॉरिस आणि अक्सर पटेलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

या मॅचनंतरही आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम पहिल्या क्रमांकावर आणि दिल्लीची टीम दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. या दोन्ही टीम याआधीच प्ले ऑफसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत.