हैदराबाद : आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई आणि चेन्नई या टीममध्ये आयपीएलची फायनल रंगेल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना होईल. संध्याकाळी ७.३० वाजता मॅचला सुरुवात होईल. याआधी मुंबई आणि चेन्नईने सर्वाधिक तीन-तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांना चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे.
फायनलमध्ये ज्या टीमचा विजय होईल, त्या टीमवर पैशांचा वर्षाव होणार आहे. फक्त विजयी टीमच नाही, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या टीमनाही पैसे मिळणार आहेत. या पैशांपैकी ५० टक्के रक्कम ही टीमला तर उरलेली ५० टक्के रक्कम खेळाडूंना मिळेल. आयपीएल जिंकणाऱ्या टीमला २० कोटी रुपये मिळणार आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाच्या टीमला १२.५ कोटी रुपये मिळतील.
यंदाच्या मोसमात दिल्लीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आणि हैदराबादची टीम चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे दिल्लीच्या टीमला १०.५ कोटी आणि हैदराबादला ८.५ कोटी रुपये मिळणार आहेत.
याशिवाय ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी १०-१० लाख रुपयांचं बक्षिस मिळेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्याला पर्पल कॅपचा मान मिळतो. सध्या हैदराबादचा डेव्हिड वॉर्नरकडे सर्वाधिक ६९२ रनसह ऑरेंज कॅप आहे. तर दिल्लीच्या कगीसो रबाडाकडे सर्वाधिक २५ विकेटसह पर्पल कॅप आहे. चेन्नईच्या इम्रान ताहीरने यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत २४ विकेट घेतल्या आहेत. फायनलमध्ये इम्रान ताहीर रबाडाकडून पर्पल कॅप स्वत: घ्यायचा आणि १० लाख रुपये जिंकण्याचा प्रयत्न करेल.
डेव्हिड वॉर्नरकडे असणारी ऑरेंज कॅप मात्र दुसऱ्या कुठल्या खेळाडूकडे जायची शक्यता कमी आहे. कारण डेव्हिड वॉर्नरच्या स्पर्धेत दुसरा कोणताही खेळाडू दिसत नाही. एवढच नाही तर यंदाच्या मोसमातल्या 'मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर'लाही १० लाख रुपयांचंच बक्षिस मिळणार आहे.