IPL 2019 : कोलकात्याच्या 'रसेलमेनिया'वर चेन्नईचा ब्रेक

कोलकात्याने ठेवलेल्या १०९ रनचा पाठलाग करताना चेन्नईचीही दमछाक झाली.

Updated: Apr 9, 2019, 11:40 PM IST
IPL 2019 : कोलकात्याच्या 'रसेलमेनिया'वर चेन्नईचा ब्रेक title=

चेन्नई : कोलकात्याने ठेवलेल्या १०९ रनचा पाठलाग करताना चेन्नईचीही दमछाक झाली. या मॅचमध्ये चेन्नईचा ७ विकेटने विजय झाला. कोलकात्याच्या माफक आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १७.२ ओव्हरमध्ये केला. चेन्नईचा ओपनर फॅप डुप्लेसिस ४३ रनवर आणि केदार जाधव ८ रनवर नाबाद राहिला. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर १८ रन असताना शेन वॉटसन १७ रन करून आऊट झाला. सुरेश रैना १४ रनवर आणि अंबाती रायुडू २१ रनवर आऊट झाला. कोलकात्याकडून सुनील नारायणने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर पियुष चावलाला एक विकेट मिळाली.

या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकून कोलकात्याला पहिले बॅटिंगला बोलावलं. चेन्नईने सुरुवातीपासूनच कोलकात्याला धक्के दिले. कोलकात्याची अवस्था एकवेळ ४७/६ अशी झाली होती. पण आंद्रे रसेलने पुन्हा एकदा कोलकात्याला सावरलं. रसेलने ४४ बॉलमध्ये ५० रन केले. कोलकात्याचे ४ खेळाडू शून्य रनवर आऊट झाले. कोलकात्याला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १०८ रनपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

कोलकात्याविरुद्धच्या या विजयामुळे चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ५ मॅच जिंकल्या तर १ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या १० पॉईंट्स आहेत. तर कोलकात्याची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने ६ पैकी ४ मॅच जिंकल्या आणि २ मध्ये पराभव पत्करला. कोलकात्याच्या खात्यात ८ पॉईंट्स आहेत.