मुंबई : क्रिकेट फॅन्सवर इंडियन प्रीमियर लीग (IPL 2019) चा फिव्हर चढलेला दिसून येतोय. प्लेऑफसाठी तीन टीमचा निर्णय झालाय परंतु, चौथ्या स्थानासाठी कुणाला संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय. फॅन्समध्येही जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. परंतु, याच दरम्यान क्रिकेटप्रेमींच्या या उत्साहावर विरजन टाकणारी एक घटना उघडकीस आलीय. आयपीएल दरम्यान सट्टेबाजीचं एक प्रकरण समोर आलंय. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनं दोन बुकींना जुहू भागातून अटक केलीय. एका मोठ्या नामांकीत हॉटेलमधून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दोन्ही बुकी अप्रवासी भारतीय (एनआरआय) आहेत. पोलिसांच्या चौकशीत या दोघांकडे हाँगकाँगची नागरिकता असल्याचं उघड झालंय. या दोघांची नावं ऋषी कन्हैयालाल दरियानानी आणि महेश खेललानी अशी आहेत. पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी चेन्नई आणि दिल्ली दरम्यान सुरू असलेल्या आयपीएल मॅचवर एका रात्रीचा सट्टा लावत असताना त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनंतर जुहू भागातील हॉटेलवर छापा घालून पोलिसांनी या दोन्ही बुकींना ताब्यात घेतलं. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर या दोघांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलीय.
दोन्ही आरोपींकडून सात मोबाईल, दोन लॅपटॉप, डायरी, अनेक बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसंच १,३७,९९३ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. हे रॅकेट कुठपर्यंत पोहचलंय? परदेशातही या रॅकेटची पाळंमुळं आहेत का? याबद्दल पोलीस अजूनही चौकशी करत आहेत. दोन्ही आरोपी एनआरआय असल्यानं परदेशातील बुकींशीही त्यांचे संबंध असल्याची शक्यता आहे.
ही मॅच चेन्नईत बुधवारी खेळण्यात आली होती. या मॅचमध्ये चेन्नईनं दिल्लीला ८० रन्सनं पछाडलंय. याचसोबत चेन्नई पॉईंट टेबलमध्ये १८ अंकांसोबत सर्वोच्च स्थानावर दाखल झालीय.
उल्लेखनीय म्हणजे, काही वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच-स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर चेन्नई आणि राजस्थान टीमवर बंदी आणण्यात आली होती. यानंतर दोन्ही टीम्स गेल्या वर्षी पुन्हा आयपीएलमध्ये दाखल झाल्या होत्या.