IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

Updated: May 9, 2019, 10:13 PM IST
IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

विशाखापट्टणम : आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. पहिल्या एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. हैदराबादकडून राशिद खानने दोन विकेट घेतल्या, तर ऑलराऊंडर मोहम्मद नबीने १३ बॉलमध्ये २० रनची खेळी केली. या दोघांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला ही मॅच जिंकता आली नाही. असं असलं तरी दिल्लीचा ओपनर शिखर धवनने राशिद खान आणि मोहम्मद नबीला सलाम केला आहे.

रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या या दोन्ही क्रिकेटपटूंनी मॅच असूनही रोजा ठेवला होता. दिवसभर काहीही न खाता हे दोघं संध्याकाळी ७.३० वाजता मैदानात उतरले. रोजा असतानाही त्यांच्या कामगिरीमध्ये कोणताही फरक पडला नाही.

शिखर धवनने मॅचनंतर या दोघांसोबतचा एक फोटो ट्विट केला. 'सगळ्यांना रमजानच्या शुभेच्छा. या दोघांबद्दल मला अभिमान आहे. दिवसभर काहीही न खाता-पिता मॅच खेळणं सोपं नाही. पण या दोघांनी अगदी सहज करून दाखवलं. दोघंही त्यांच्या देशासाठी आणि विश्व क्रिकेटसाठी प्रेरणा देणारे आहेत. तुमची उर्जा सगळ्यांना मोठी स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देते. अल्लाहचा आशिर्वाद तुमच्यावर असाच राहो,' असं ट्विट शिखर धवनने केलं.

दिल्लीकडून पराभव झाल्यामुळे हैदराबाद आयपीएलमधून बाहेर पडली आहे. तर आता क्वालिफायर-२ मध्ये दिल्लीचा सामना चेन्नईशी होणार आहे. या मॅचमधली विजयी टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. मुंबईच्या टीमने याआधीच फायनल गाठली आहे. १२ मे रोजी आयपीएलची फायनल खेळवण्यात येईल.

शिखर धवन, राशिद खान आणि मोहम्मद नाबी यांनी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. धवनने १५ मॅचमध्ये ५०३ रन केले आहेत. या मोसमात ५०० रन पेक्षा जास्त करणारा धवन चौथा खेळाडू आहे. राशिद खानने या मोसमातल्या १५ मॅचमध्ये १७ विकेट घेतल्या आणि ३४ रन बनवले. मोहम्मद नबीने ८ मॅचमध्ये ८ विकेट घेतल्या आणि ११५ रन केल्या.

या मॅचमध्ये शिखर धवनने १६ बॉलमध्ये १७ रन केले. दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत. पृथ्वी शॉने ३८ बॉलमध्ये ५६ रनची आणि ऋषभ पंतने २१ बॉलमध्ये ४९ रनची आक्रमक खेळी केली.