IPL 2019: 'धोनीच्या निवृत्तीनंतर मी होऊ शकतो कर्णधार'; रैनाचे संकेत

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला. 

Updated: May 2, 2019, 08:50 PM IST
IPL 2019: 'धोनीच्या निवृत्तीनंतर मी होऊ शकतो कर्णधार'; रैनाचे संकेत title=

चेन्नई : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला. एमएस धोनीचं टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर चेन्नई पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर आली आहे. यंदाच्या मोसमात धोनीला २ मॅच खेळता आल्या नाहीत आणि या दोन्ही मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला होता. यामुळे चेन्नईची टीम फक्त धोनीवरच अवलंबून आहे, अशी टीकाही झाली होती. धोनी टीममध्ये नसल्यामुळे विरोधी टीमवरचा दबाव कमी होतो. धोनी निवृत्त झाल्यानंतर चेन्नईच्या टीमचं काय होणार? असे प्रश्न विचारण्यात आले.

'कर्णधारापेक्षा बॅट्समन म्हणून धोनीची गरज'

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये सुरेश रैनाने सर्वाधिक ५९ रनची खेळी केली. धोनीच्या गैरहजेरीत कर्णधारपद भुषवणं किती कठीण होतं? असं रैनाला विचारण्यात आलं. यावर रैना म्हणाला, 'कर्णधार धोनीपेक्षा बॅट्समन धोनीची आम्हाला जास्त गरज आहे. धोनी नसतो तेव्हा बॅटिंगमध्ये आमची जास्त अडचण होते. हैदराबाद आणि मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येही असंच झालं. धोनी बॅटिंग करत असेल, तर विरोधी टीम दबावामध्ये येतात. तो नसताना काय फरक पडतो, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे.'

'धोनीनंतर कर्णधार होऊ शकतो'

धोनीनंतर मी कर्णधारपद सांभाळू शकतो, असे संकेत रैनाने दिले. 'मागच्या काही वर्षांपासून बॅट्समन म्हणून मी चांगली कामगिरी करत आहे. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर मी कर्णधार होऊ शकतो. पण धोनी त्याला पाहिजे तितका वेळ चेन्नईकडून खेळेल. तुम्ही धोनीला आणि चेन्नईला ओळखता,' असं वक्तव्य रैनाने केलं.

या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगला बोलावलं होतं. चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सुरेश रैनाने ५९ रन, डुप्लेसिसने ३९ रन आणि जडेजाने २५ रनची खेळी केली. पण धोनीने २२ बॉलमध्ये ४४ रन काढून चेन्नईला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.