मुंबई : अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये मुंबईने पंजाबचा पराभव केला. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ३१ बॉलमध्ये ८३ रनची वादळी खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. पोलार्डने ही विस्फोटक खेळी केली असली, तरी मोक्याच्या क्षणी पोलार्ड आऊट झाला. अखेर अल्झारी जोसेफ आणि राहुल चहरने मुंबईचा विजय खेचून आणला. मुंबईला शेवटच्या बॉलवर २ रनची गरज असताना अल्झारी जोसेफनं २ रन काढून मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
अल्झारी जोसेफला शेवटच्या बॉलवर दोनऐवजी एकच रन काढता आली असती, तर ही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली असती.
काय आहेत सुपर ओव्हरचे नियम?
- मॅच संपल्यानंतर १० मिनिटांच्या आत सुपर ओव्हर सुरु झाली पाहिजे.
- सुपर ओव्हर एकच ओव्हरची असते.
- सुपर ओव्हर ही ज्या खेळपट्टीवर मॅच झाली त्याच खेळपट्टीवर झाली पाहिजे.
- मॅचमध्ये खेळलेले खेळाडूच सुपर ओव्हरमध्ये भाग घेऊ शकतात.
- मॅचमध्ये जी टीम दुसरी बॅटिंग करते, त्या टीमला सुपर ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग मिळते.
- फिल्डिंग करणारा कर्णधार सुपर ओव्हरसाठीच्या बॉलची निवड करतो,
- सुपर ओव्हरमध्ये २ विकेट गेल्यानंतर टीमची बॅटिंग तिथेच संपते.
- सुपर ओव्हरमध्ये जी टीम सर्वाधिक रन करते त्यांना विजेता घोषित केलं जातं.
जर सुपर ओव्हर टाय झाली तर
- सुपर ओव्हर टाय झाली तर मॅच आणि सुपर ओव्हरमध्ये जी टीम सर्वाधिक बाऊंड्री (फोर आणि सिक्स) मारेल त्या टीमचा विजय होतो.
- जर दोन्ही टीमच्या बाऊंड्रीही सारख्याच असतील, तर ज्या टीमचा बॅट्समन मॅचमध्ये (सुपर ओव्हर सोडून) सर्वाधिक बाऊंड्री मारतो त्या टीमला विजेता घोषित केलं जातं.
- खेळाडूंच्या बाऊंड्रीही सारख्या असतील, तर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही टीमनी सहाव्या बॉलपासून केलेला स्कोअर बघितला जातो. उदाहरणार्थ
बॉल | टीम-१च्या रन | टीम-२च्या रन |
सहावा बॉल | १ | १ |
पाचवा बॉल | ४ | ४ |
चौथा बॉल | २ | १ |
तिसरा बॉल | ६ | २ |
दुसरा बॉल | ० | १ |
पहिला बॉल | २ | ६ |
एकूण | १५ | १५ |
या टेबलवर नजर टाकली तर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही टीमने १५ रनच केल्या आहेत. सहाव्या आणि पाचव्या बॉलवर दोन्ही टीमनी केलेला स्कोअरही सारखाच आहे. पण चौथ्या बॉलवर टीम-१ ने २ रन आणि टीम-२ ने एक रन केली आहे. त्यामुळे टीम-२ ला विजेता घोषित करण्यात येतं. नो किंवा वाईड बॉल सोडून जे बॉल अधिकृत आहेत तेच ग्राह्य धरले जातात.
- यानंतरही दोन्ही टीमनी सगळ्या ६ बॉलवर सारख्याच रन केल्या, तर मॅच टायच राहते.