मुंबई : आयपीएलच्या १३व्या मोसमासाठी मुंबईची टीम युएईला रवाना झाली आहे. पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच मुंबईच्या टीमला धक्का बसला आहे. मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू असलेला लसिथ मलिंगा सुरुवातीच्या काही मॅचना मुकणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात आयपीएल खेळवली जाणार आहे. वैयक्तिक कारणामुळे मलिंगा आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅच खेळू शकणार नाही.
लसिथ मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही आठवड्यांमध्ये शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलिंगा वडिलांसोबत असणार आहे. मलिंगा शेवटच्या काही मॅच आणि प्ले ऑफसाठी मुंबईच्या टीममध्ये येईल, कारण या मॅचमध्ये त्याचा अनुभव कामाला येईल, असंही सांगण्यात येत आहे.
मागच्या वर्षी मुंबईने आणखी एका आयपीएलवर आपलं नाव कोरलं. चेन्नईविरुद्धच्या फायनलमध्ये मलिंगाने शेवटच्या ओव्हरला ८ रन रोखल्या. पहिल्या तीन ओव्हरमध्ये ४२ रन दिल्यानंतरही मलिंगाने शेवटच्या ओव्हरमध्ये सामना खेचून आणला. शेवटच्या बॉलवर चेन्नईला विजयासाठी २ रनची गरज असताना मलिंगाने शार्दुल ठाकूरला एलबीडब्ल्यू करून मुंबईला चौथ्यांदा आयपीएल जिंकवून दिली.
कोरोनाच्या संकटात श्रीलंकेने केलेल्या नियमांमुळेही मलिंगाची अडचण झाली. परदेशातून श्रीलंकेत येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येतं. त्यामुळे मलिंगा युएईमध्ये आयपीएलसाठी गेला असता तर त्याला वडिलांच्या उपचारासाठी श्रीलंकेला परतल्यावर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागलं असतं.
लसिथ मलिंगा हा आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. पहिल्या मोसमापासून सोबत असलेला मलिंगा मुंबईचं ट्रम्प कार्ड आहे. आयपीएलमध्ये मलिंगाने सर्वाधिक १७० विकेट घेतल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये मलिंगा ड्वॅन ब्राव्होनंतर सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे.
२००८ म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून मलिंगा मुंबईच्या टीमचा हिस्सा होता. पण दुखापतीमुळे त्याला पहिला मोसम खेळता आला नाही. २००९ पासून मलिंगा मुंबईकडून खेळला. २०१८ साली तो मुंबईच्या टीमचा बॉलिंग सल्लागार होता, तर मागच्यावर्षी मुंबईनेच त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतलं. मुंबईसाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरली.
मलिंगाच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईकडे बरेच पर्याय आहे. मुंबईच्या टीममध्ये जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाईल, ट्रेन्ट बोल्ट, मिचेल मॅकलेनघन, धवल कुलकर्णी हे फास्ट बॉलर आहेत. तर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत.
मार्च महिन्यापासून सुरू होणारी आयपीएल कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आली. भारतातली कोरोनाची परिस्थिती पाहता ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला.