मुंबई: वाढत्या कोरोनाचं संकट आयपीएलवर ओढवलं आहे. एकीकडे कोरोना आणि बायो बबलमधून बाहेर पडत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्वदेशी जात आहेत. तर दुसरीकडे आता IPLच्या टीम्समध्ये कोरोना शिरल्यानं आता भीती व्यक्त केली जात आहे.
चेन्नई संघातील बॉलिंग कोच बालाजी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. BCCIच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना 6 दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्स संघाने 7 मे रोजी खेळवला जाणारा राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना खेळणार नाही असा निर्णय घेतला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई संघाने 7 मे रोजीचा राजस्थान रॉयल्स सोबतचा सामना तात्पुरता स्थगित करून पुन्हा रिशेड्युल करण्याची विनंती BCCIला केली आहे.
कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. हा सामना रिशेड्युल करण्यात येणार आहे. चेन्नईच्या फ्रांचायझीमध्ये देखील कोरोना शिरल्यानं त्यांनी राजस्थान संघासोबतचा सामना रिशेड्युल करण्याची मागणी केली आहे.
कोरोनामुळे 3 मे रोजी अहमदाबादमध्ये होणारा KKR विरुद्ध RCBचा सामना यापूर्वी स्थगित करण्यात आला आहे. कोलकाताचे दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह आलेले खेळाडू सध्या क्वारंटाइन आहेत.
सोमवारी आयपीएलमधील 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यामध्ये कोलकाताचे 2 खेळाडू, चेन्नई सुपरकिंग्सचे 3 कर्मचारी, ज्यात एका लक्ष्मीपती बालाजीचा समावेश होता. या व्यतिरिक्त डीडीसीएच्या 5 ग्राउंड स्टाफनाही कोरोनाची लागण झाली आहे.