IPL 2021 DC vs RR: संजू सॅमसनचे प्रयत्न अपयशी, दिल्लीचा 33 धावांनी राजस्थानवर विजय

राजस्थानला पराभूत करून दिल्ली संघ ठरला पहिला प्लेऑफचा मानकरी

Updated: Sep 25, 2021, 08:17 PM IST
IPL 2021 DC vs RR: संजू सॅमसनचे प्रयत्न अपयशी, दिल्लीचा 33 धावांनी राजस्थानवर विजय

दुबई: आयपीएलच्या 36 व्या सामन्यात संजू सॅमसनच्या टीमला पराभूत करण्यात दिल्ली संघ यशस्वी ठरला आहे. दिल्ली संघाने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. राजस्थानवर 33 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये संजू सॅमसनचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला. मात्र टीमचे प्रयत्न विजयासाठी काहीसे कमी पडले. दिल्ली संघाने 33 धावांनी विजय मिळवला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला. 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्स संघ निर्धारित 20 ओवरमध्ये 6 गडी गमावून 121 धावा करू शकला आणि सामना गमावला.राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण त्याची अर्धशतकी खेळी कामी आली नाही. त्याने 53 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. त्याच्या प्रयत्नांना इतर फलंदाजांची साथ थोडी कमी पडल्याचं या सामन्यात पाहायला मिळालं.

दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 154 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 32 चेंडूत 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथा विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं. ऋषभ पंतच्या संघाचे 10 सामन्यात 16 गुण मिळवले आहेत. दिल्लीने प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आता पॉइंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.