जिंकलास भावा | कृणाल पंड्याच्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली, पाहा नक्की काय झालं?

 मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याच्या (Krunal Pandya Shows Sportsman Sprit) एका कृतीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.

Updated: Sep 28, 2021, 10:43 PM IST
जिंकलास भावा | कृणाल पंड्याच्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली, पाहा नक्की काय झालं?

यूएई : क्रिकेटमध्ये (Cricket) विशेष करुन आयपीएलच्या (IPL) सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू सहजपणे भिडतात. या अशा कृतींमुळे क्रिकेट खेळाची प्रतिमा मलिन होते. मात्र मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याच्या (Krunal Pandya Shows Sportsman Sprit) एका कृतीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 42 वा सामना मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान कृणाल पंड्याने त्याच्या बॉलिंगवर पंजाबचा कर्णधाराला आऊट केलं. मात्र त्यानंतरही कृणालने त्याला आऊट देऊ नये, असं म्हंटलं. त्याच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. यासह कृणालने खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. (ipl 2021 mumbai indians vs punjab kings Krunal Pandya Shows Sportsman Spirit he rejected appel of k l rahul)

नक्की काय घडलं?

मुंबईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबच्या डावातील आणि पावर प्लेमधील शेवटची अर्थात 6 वी ओव्हर कृणाल पंड्या टाकायला आला. या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर हा सर्व प्रकार घडला. 

कृणालने ओव्हरमधील सहावा चेंडू राउंड द विकेट टाकला. डावखुरे गोलंदाज साधारणपणे अंपायरच्या उजव्या बाजूने बॉलिंग टाकतात. मात्र कृणाल अंपायरच्या डाव्या बाजूने बोलिंग करत होता. यालाच राउंड द विकेट म्हणतात. कृणाल राउंड द विकेट बोलिंग करत असल्याने केएल राहुल अंपायरच्या उजव्या बाजूला उभा होता. सहाव्या चेंडूवर ख्रिस गेल स्ट्राईकवर होता. 

कृणालने चेंडू टाकला. गेलने तो चेंडू केएलच्या दिशेने मारला. गेलने मारलेला फटका केएलला लागून कृणालच्या दिशेने गेला. तेवढ्यात नॉन स्ट्राईक एंडवर असलेला केएल क्रीझच्या बाहेर गेला होता. केएल फिरून क्रीझच्या आत येण्याआधीच कृणालने बॉल थ्रो करत केएलला रनआऊट केलं. 

हा सर्व प्रकार इतक्या लवकर घडला की केएल आऊट आहे की नॉट आऊट आहे, हे अंपायरलाही समजलं नाही. कृणालनेही आग्रहीपणे अंपायरकडे अपील केली.  फिल्ड अंपायरने थर्ड अंपायरची मदत घेतली.  

मात्र तितक्यात केएलसोबत नक्की काय झालं हे कृणालला समजलं. केएल आऊट होता. मात्र त्यानंतरही कृणालने तितक्याच आग्रहीपणे त्याने केलेली अपील फेटाळली.

कृणालच्या या कृतीमुळे केएलही भारावला. केएलने या कृतीसाठी कृणालला अंगठा दाखवत त्याच्या या कृतीबद्दल शाबसकी दिली. कृणालने या कृतीतून खेलाडुवृत्तीचं दर्शन घडवलं. कृणालच्या या मन जिंकणाऱ्या कृतीसाठी मुंबई इंडियन्सकडून ट्विट करण्यात आलंय. तसंच सोशल मीडियावरही कौतुक होतंय.