मुंबई : दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 44 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाताचा 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर बाजार उठवला. ज्या कोलकाताने कुलदीपला टीममधून बाहेर केलं त्याच कुलदीपने कोलकाताचा गेम केला. (ipl 2022 kkr vs dc delhi capitals kuldeep yadav bowled game changing 16 over take 3 wickets an over)
कुलदीप यादव दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट्स घेत मॅच दिल्लीला विजयी केलं. विशेष म्हणजे कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत मॅच दिल्लीच्या बाजूने फिरवली.
कुलदीप यादवने कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, सुनिर नरेन आणि उमेश यादव या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 8.80 च्या इकॉनॉमी रेटने 35 धावा दिल्या. विशेष म्हणजे कुलदीपने आयपीएलमधील 50 विकेट्सही पूर्ण केल्या.
कुलदीपने 16 व्या ओव्हरमध्ये कोलकाताच्या 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप सामन्यातील 16 वी ओव्हर टाकायला आला. कोलकाताला विजयासाठी 30 बॉलमध्ये 79 धावांची गरज होती.
मैदानात पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल हे दोघे राक्षसी फलंदाज मैदानात होते. मात्र कुलदीपने आपल्या फिरकीच्या जोरावर मॅच फिरवली.
कुलदीपने या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर पॅट कमिन्सला एलबीडबल्यू आऊट केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नरेनने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर कुलदीपने नरेनला सडेतोड उत्तर दिलं.
नरेनने पाचव्या चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हरवरुन फटका मारला. रोवैन पॉवेलने नरेनची कॅच पकडली आणि कोलकाताला सातवा झटका लागला. नरेन 2 बॉलमध्ये 4 धावा करुन माघारी परतला. यानंतर कुलदीपने या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर उमेश यादवला भोपळाही फोडून दिला नाही.
कुलदीपने आपल्याच बॉलिंगवर धावत जात उमेशचा शानदार कॅच घेतला आणि आयपीएलमधील 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे कुलदीप या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत उमेश यादवसोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वार्नर, रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद.
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन | श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती.