Anand Mahindra Viral Tweet on Shubman Gill Century: इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वाचा (IPL 2023) अंतिम सामना आज गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या संघांदरम्यान (GT vs CSK Final) हा सामना खेळवला जाणार आहे. गुजरातने क्वालिफायर-2 च्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत अगदी थाटात मुंबई इंडियन्सला (GT vs MI) पराभूत करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यानंतर अंतिम सामना खेळवण्याआधीच प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रांनी गुजरातचा सालामीवीर आणि क्वालिफायर-2 मधील शतकवीर शुभमन गिलबद्दल (Shubman Gill) एक विधान केलं असून सध्या हे विधान चांगलेच चर्चेत आहे.
क्वालिफायर-2 मध्ये गुजरातचा सालामीवीर शुभमन गिलने दमदार शतकी खेळी केली. शुभमने 60 चेंडूंमध्ये 129 धावांची खेळी केल्याने गुजरातला 200 हून अधिक धावांचं लक्ष्य मुंबईसमोर ठेवता आलं. हे लक्ष्य मुंबईला काढता आलं नाही. मुंबई इंडियन्सचा संघ 234 धावांचा पाठलाग करताना 171 धावांवरच बाद झाला. गुजरातच्या या विजयामध्ये शुभमनच्या खेळीने मोलाचा वाटा उचलला. शुभमनची खेळी पाहून अनेकजण थक्क झाले असून यात उद्योजक आनंद महिंद्रांचाही समावेश आहे.
Stand and applaud the Shubman Gill SHOW #TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @ShubmanGill pic.twitter.com/ADHi0e6Ur1
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
शुभमने आपल्या खेळीदरम्यान 10 षटकार आणि 7 चौकार लगावत दमदार खेळी केली. याच खेळीचं कौतुक आनंद महिंद्रांनीही केलं आहे. महिंद्रांनी ट्विटरवरुन शुभम गिलचं कौतुक केलं. "ही व्यक्ती म्हणजे भारताची नवीन रन-मशीन आहे. आम्ही त्याला भेट दिलेली 'थार' जेव्हा जेव्हा हा (शुभमन) तिच्या पेडलवर पाय ठेवत असेल तेव्हा उत्साहाने थरथरत (आनंदी होत) असेल," असं महिंद्रांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 2021 साली झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या तरुण भारतीय खेळाडूंना आनंद महिंद्रांनी त्यावेळी नव्याने लॉन्च झालेली थार गाडी भेट म्हणून दिली होती. यामध्ये टी. नटराजन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, नवदीप सानी आणि वॉशिंग्टन सुंदर या 6 खेळाडूंचा समावेश होता. त्याच गाडीचा उल्लेख महिंद्रा यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.
मुंबईविरुद्ध गिलने झळकावलेलं शतक हे त्याचं यंदाच्या आयपीएलमधील तिसरं शतक आहे. त्याने या 129 धावांच्या माध्यमातून आपल्या टी-20 करियरमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलरच्या नावे आहे. या दोघांनी प्रत्येकी 4-4 शतकं झळकावली आहेत. गिलने यंदाच्या पर्वात 851 धावा केल्या आहेत. यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज कॅपही गिलकडेच आहे. एका पर्वामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभमन तिसऱ्या स्थानी आहे. त्याला अंतिम सामन्यात दुसऱ्या स्थानी झेप मारण्याची संधी आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शुभमन पुन्हा शतक झळकावणार का? याकडे सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.