S. Sreesanth on Hardik Pandya: गुजरात टायटन्सच्या संघासाठी इंडियन प्रिमिअर लिग 2024 च्या पर्वाची सुरुवात तशी कडू-गोडच राहिली. 2022 च्या आपल्या पहिल्याच पर्वात जेतेदावर नाव करणाऱ्या गुजरातच्या संघाचं नेतृत्व यंदा शुभमन गिल करत आहे. शुभमनच्या नेतृत्वाखाली यंदाच्या पर्वातील पहिल्याच सामन्यात गुजरातने माजी कर्णधार हार्दिक पंड्या नेतृत्व करत असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. मात्र 2023 च्या पर्वामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून गुजरातचा संघ 63 धावांनी पराभूत झाला. चेपॅकॉच्या मैदानावर चेन्नईच्या संघाने दिलेलं 207 धावांचं आव्हान गुजरातच्या संघाला पेलता आलं नाही. गुजरातच्या संघाला 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. धावांचा विचार केल्यास गुजरातचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईच्या संघात गेल्यापासून नव्याने गुजरातचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या शुभमन गिलची नेमकी भूमिका काय आहे याबद्दल चर्चा सुरु आहे. याचसंदर्भात बोलताना भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने सूचक विधान केलं आहे. हार्दिक पंड्या संघात नसल्याचा गुजरातच्या संघाला फायदाच झाला आहे, असं एस. श्रीशांतने म्हटलं आहे. "गुजरात टायटन्सच्या संघात हार्दिक पंड्या नसल्याने गोलंदाजांनी कशी गोलंदाजी करावी हे सांगणारा कोणी नाही. काहीवेळेस तुम्हाला गोलंदाजांना स्वातंत्र्य देणं अपेक्षित असतं. यंदा कर्णधारपद गिलकडे आहे. मला खात्री आहे की आशिष भाई (आशिष नेहरा) 'त्यांच्या मनानुसार त्यांना गोलंदाजी करु दे' असं सांगत असेल. कर्णधाराबरोबरच तरुण गोलंदाजही ही गोष्ट जबाबदारी म्हणून स्वीकारत असतील. तरुण कर्णधार असल्याचा हाच फायदा असतो," असं श्रीशांत म्हणाला.
नक्की पाहा >> 4, 4, 6, 4, 6, 1... शेवटच्या ओव्हरमध्ये परागची तुफान फटकेबाजी! इथेच सामना फिरला; पाहा Video
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यामध्ये शुभमन गिलला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शुभमन 5 बॉलमध्ये 8 धावा करुन बाद झाला. दिपक चहरने त्याची विकेट घेतली. "आम्ही फलंदाजी करत असताना त्यांनी आम्हाला मागे टाकलं. त्यांनी जसं ठरवलं तसं सामन्यात घडत गेलं. आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगला स्कोअर व्हावा यासाठी प्रयत्न करत होतो. त्यावर आमची पुढील कामगिरी अवलंबून होती. हवा तितका स्कोअर आम्हाला पॉवर प्लेमध्ये करता आला नाही आणि नंतर आम्ही ती तूट भरुन काढण्यासाठीच खटपट करत होते. आमच्यासाठी हा सामना फार दुर्देवी ठरला. टी-20 मध्ये कायमच 10-15 धावांच्या फरकाने सामन्याचा निर्णय लागतो. खेळपट्टी पाहता आम्ही 190 ते 200 धावांचा पाठलाग करावा लागेल असं गृहित धरलं होतं. या सामन्यातून आमच्या गोलंदाजांना चांगला धडा मिळाला," असं गिल चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला.
नक्की वाचा >> IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का
गुजरातचा पुढील सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे.