IPL 2024: आयपीएलमध्ये काही खेळाडू पहिल्यापासून एकाच संघासह जोडलेले आहेत. जेव्हा कधी त्यांचं नाव घेतलं जातं, तेव्हा आपोआप त्या संघाचं नाव त्यांच्याशी जोडलं जातं. ज्याप्रमाणे विराट कोहली म्हटलं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, धोनी म्हटलं की चेन्नई सुपरकिंग्ज आणि रोहित शर्मा म्हटलं की मुंबई इंडियन्स हे नाव आपोआप तोंडी येतं. आयपीएल सुरु झाल्यापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. पण या हंगामात कर्णधारपदावरुन झालेल्या वादानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो अशी चर्चा रंगली आहे.
आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरु होऊन इतके दिवस झाल्यानंतरही अद्याप मुंबई इंडियन्समधील कर्णधारपदावरुन रंगलेला वाद मिटलेला नाही. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवणं अनेकांना आवडलेलं नाही. त्यातच आयपीएल 2025 च्या आधी मेगा लिलावल होणार आहे. यामध्ये अनेकदा संघ आपल्या खेळाडूंना रिलीज करत असतं. या लिलावात रोहित शर्मासंबंधी मोठी घडामोड पाहायला मिळू शकते.
यादरम्यान मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडूने यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. मुंबईत संघात जे झालं ते पाहता रोहित शर्मा जे चांगले वागणूक देतील अशा फ्रँचाईजीची निवड करेल असं परखड मत अंबाती रायडूने स्टार स्पोर्टशी संवाद साधताना म्हटलं आहे.
अंबाती रायडूने म्हटलं की, "दिवसाच्या शेवटी रोहितच निर्णय घेईल. त्याची इच्छा असेल त्या संघात तो जाईल. प्रत्येत संघाला तो आपल्याकडे यावा आणि संघाचं नेतृत्व करावं असं वाटत असेल. रोहितच काय तो निर्णय घेईल. मला खात्री आहे की, इथे जे झालं हे ते पाहता जी फ्रँचाईजी चांगली वागणूक देईल अशी संघाची रोहित शर्मा निवड करेल".
Ambati Rayudu
"Every other franchise will want Rohit Sharma as captain and will treat him better than what Mumbai Indians did."
Bro owned entire Mumbai Indians management with one statement. pic.twitter.com/XqHFOJSzg1
— (@SelflessCricket) April 10, 2024
रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्याने मुंबईच्या चाहत्यांमध्ये असलेली नाराजी मिटवण्यास अद्यापही संघाला यश आलेलं नाही. मुंबईच्या प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांकडून हार्दिकविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. त्यात मुंबईने 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकला असल्याने हार्दिकला कामगिरीतूनही उत्तर देता आलेलं नाही.
रोहित शर्मा मुंबई संघ सोडणार की नाही याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. पण लखनऊ सुपरजायंट्सने रोहित शर्माला संघात घेण्यास रस दाखवला आहे. युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत त्यांनी आयपीएल 2025 मधील लिलावात रोहितसाठी प्रयत्न करु शकतो असं सूचकपणे म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये, मुलाखतकाराने लखनऊचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना जर कोणत्याही खेळाडूला संघात घेण्याची संधी मिळाली तर कोणाला घ्याल असं विचारलं. त्यावर त्यांनी मुलाखतकारालाच तुला काय वाटतं असा प्रश्न केला. त्यावर त्याने म्हटलं की, तसं तर आपण प्रत्येक बाजू सांभाळली आहे. पण आपण रोहित शर्माला घेऊ शकतो का?. यावर जस्टिन लँगर हसतात आणि तुम्ही मध्यस्थी करा असं सांगतात.