'उगाच गरजेपेक्षा जास्त...,' विराट कोहलीचं मैदानातील ते कृत्य पाहून मॅथ्यू हेडन संतापला, 'तू काय स्वत:ला..'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जविरोधातील (CSK) सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) वारंवार अम्पायर्सकडे जाऊन काहीतरी बोलत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) यावर आक्षेप घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 09:43 PM IST
'उगाच गरजेपेक्षा जास्त...,' विराट कोहलीचं मैदानातील ते कृत्य पाहून मॅथ्यू हेडन संतापला, 'तू काय स्वत:ला..' title=

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जविरोधातील (CSK) सामन्यादरम्यान बंगळुरुचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) वारंवार अम्पायर्सकडे जाऊन संवाद साधत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनला (Matthew Hayden) ही गोष्ट अजिबात आवडलेली नसून यावर आक्षेप घेतला आहे. विराट कोहली कर्णधार फाफ डू प्लेसिसपेक्षा जास्त वेळा अम्पायर्सशी संवाद साधणं मॅथ्यू हेडनच्या पचनी पडलेलं नाही. विराट कोहली कर्णधार नाही अशा शब्दांत त्याने आपला निषेध नोंदवला आहे. 

चेन्नईविरोधातील सामन्यात 12 व्या ओव्हरला हा प्रकार घडला. दोन्ही अम्पायर मैदानात काहीतरी बोलण्यासाठी जवळ आले असता विराट कोहली त्यांच्याजवळ गेला आणि कानात काहीतरी बोलला. विराटच्या या कृत्याने मॅथ्यू हेडनचं लक्ष वेधून घेतलं. याआधी एक ते दोन वेळा विराट कोहलीने अम्पायरशी जाऊन संवाद साधला होता. मात्र यावेळी मॅथ्यू हेडनने आपला निषेध नोंदवला आणि इतक्या वेळा मध्यस्ती करणं हे विराट कोहलीचं काम किंवा जबाबदारी नाही अशा शब्दांत सुनावलं. 

"विराट कोहलीकडून गरजेपेक्षा जास्त मध्यस्थी केली जात आहे. तो कर्णधार नाही आहे. अम्पायरसी होणाऱ्या संवादात तो सहभागी असण्याचं कारण नाही," असं मॅथ्यू हेडनने समालोचन करताना म्हटलं.

चेन्नईविरोधातील सामना करो या मरो असल्याने विराट कोहली मैदानात प्रचंड आक्रमक दिसत होता. चौकार आणि षटकार लगावल्यानंतर प्रत्येक चेंडूवर विराट कोहली बॅटवर पंच करत होता. त्याचा हा उत्साह फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजी करतानाही होता. प्रत्येक विकेटनंतर विराट कोहली जणू काही आपणच विकेट घेतल्याप्रमाणे जोरदार आणि आक्रमक सेलिब्रेशन करत होता. 

हर्षा भोगले यांनी RCB ला सुनावलं

बंगळुरुने (RCB) केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवासह कदातिच महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील प्रवासही संपला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता होता. याचं कारण डगआऊटमध्ये बसलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंशी हँडशेक न करताच ड्रेसिंग रुममध्ये गेला. दरम्यान भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Vaughan) यांनी बंगळुरुच्या खेळांडूंवर नाराजी व्यक्त केली आहे. धोनी आऊट झाल्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी त्याचा हा अंतिम सामना असू शकतो हे माहिती असतानाही हँडशेक न केल्याने त्यांनी सुनावलं आहे.  

बंगळुरुच्या खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनी आऊट झाल्यानंतर त्याचा सन्मान राखत मैदानातून निरोप द्यायला हवा होता असं हर्षा भोगले आणि मायकल यांना वाटत आहे. 42 वर्षीय धोनीने अद्याप अधिकृतपणे आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही, मात्र हा त्याचा शेवटचा हंगाम होता अशा जोरदार चर्चा आहेत. 

"त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही विश्वचषकातील अंतिम सामना जिंकलात, तरीही विरोधी संघाशी हस्तांदोलन करता. आपल्या खेळातील ही एक मोठी गोष्ट आहे. कारण आता आपलं वैर संपलं आहे, या वस्तुस्थितीचं ते प्रतीक आहे. हा फक्त एक खेळ होता आणि आता आपल्यात काही नाही,” असं हर्षा भोगले यांनी Cricbuzz ला सांगितलं".