IPL 2024: 'पांड्याने फार चुका केल्या,' MI च्या पराभवानंतर इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं, 'प्रेशर असतानाही स्वत:...'

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असल्याने सर्वांचं लक्ष होतं. गुजरातने या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली.   

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2024, 05:15 PM IST
IPL 2024: 'पांड्याने फार चुका केल्या,' MI च्या पराभवानंतर इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं, 'प्रेशर असतानाही स्वत:...' title=

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असल्याने सर्वांचं लक्ष होतं. गुजरातने अखेरच्या क्षणी जबरदस्त कामगिरी करत एका क्षणी मुंबई इंडियन्ससाठी सहज वाटणारा विजय हिरावून घेतला. दरम्यान या पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात हार्दिकने फार मोठ्या चुका केल्या, ज्यामुळे संघाला पराभवाची किंमत मोजावी लागली असं इरफानने म्हटलं आहे. हार्दिकने गोलंदाजीची सुरुवात करताना 20 धावा दिल्या. त्याने जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती असं इरफानने सांगितलं. 

"हार्दिक पांड्याने सामन्यात अनेक मोठ्या चुका केल्या. पॉवरप्लेमध्ये त्याने स्वत: 2 ओव्हर टाकल्या. ही फार मोठी चूक होती. त्याने जसप्रीत बुमराहला फार उशिरा आणलं," असं इरफानने त्याच्या इंस्टाग्राम व्हिडीओत सांगितलं. पुढे त्याने सांगितलं की, "दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते धावांचा पाठलाग करत होते तेव्हा टीम डेव्हिडला वरती पाठवलं. राशीद खानची एक ओव्हर शिल्लक असतानाही त्याने टीम डेव्हिडला पाठवलं".

"मला वाटतं हार्दिक फार काळ क्रिकेटपासून दूर असल्याने त्याला राशीद खानचा सामना करायचा नव्हता. ही बाब असू शकते. दबाबावत्मक स्थिती असताना एक अनुभवी फलंदाज ड्रेसिंग रुममध्ये बसलेला होता आणि एका परदेशी खेळा़डूला राशीदचा सामना करण्यासाठी पाठवणं हे पचणारं नाही. त्यांना इथे खेळ समजला नाही," असं इरफानने म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सची रणनीती फसली आणि शुभमन गिलने कर्णधार म्हणून यशस्वी पदार्पण केलं. गुजरातने मुंबईचा 6 धावांनी पराभव केला. जसप्रीत बुमरहाने नेहमीप्रमाणे या सामन्यातही जबरदस्त कामगिरी केली. त्याने 14 धावांवर 3 विकेट्स मिळवले. त्याने आपल्या यॉर्करच्या मदतीने गुजरातला 168 धावांवर रोखलं. मात्र बुमरहाचे प्रयत्न कमी पडले, कारण फलंदाज अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. 

मुंबई इंडियन्स संघ 162 धावांवर 9 गडी बाद राहिला. मुंबई इंडियन्सला शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 43 धावांची गरज होती. यावेळी त्यांच्या हातात 7 विकेट होत्या. पण गुजरातने कडवी झुंज दिली आणि सामना मुंबईकडून हिरावून घेतला.