'सिलेक्टर्सच्या पाया पडलो नाही म्हणून...'; प्लेऑफआधीच गौतमच्या 'गंभीर' विधानाने खळबळ

Gautam Gambhir Explosive Comment: गौतम गंभीर हा त्याच्या खेळाबरोबरच सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. असं असतानाच त्याने आयपीएलचे प्लेऑफचे सामना सुरु होण्याआधी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 21, 2024, 12:50 PM IST
'सिलेक्टर्सच्या पाया पडलो नाही म्हणून...'; प्लेऑफआधीच गौतमच्या 'गंभीर' विधानाने खळबळ title=
युट्यूबवरील मुलाखतीत बोलताना केला खुलासा (फाइल फोटो)

Gautam Gambhir Explosive Comment: भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने पुन्हा एकदा त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वामध्ये अंतिम चारमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला स्थान मिळवून देण्यात मेंटॉर म्हणून गंभीरने मोलाची भूमिका पार पाडली आहे. गंभीरच्या मार्गदर्शनामुळेच केकेआरच्या संघाने साखळी सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. आता गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेकआर पुन्हा एकदा आयपीएल जिंकतो का हे लवकरच स्पष्ट होईल. आज म्हणजेच 21 मे रोजी कोलकात्याचा संघ पहिल्या एलिमिनेटर सामन्यात सन रायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. मात्र मैदानावरील कामगिरीबरोबर गंभीरने केलेल्या काही विधानांनी चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. गंभीर हा त्याच्या स्फोटक विधानांसाठी ओळखता जातो. असेच एक विधान त्याने पुन्हा केलं आहे. 

'तेव्हा मी 12-13 वर्षांचा असेन...'

फिरकीपटू आर. अश्विनच्या युट्यूब चॅनेलवरील चर्चेत गंभीर सहभागी झाल होता. आपल्या करिअरबद्दल बोलताना गंभीरने सुरुवातीच्या दिवसांमध्ये कसा संघर्ष करावा लागला हे सांगितलं. 14 वर्षांखालील संघामध्ये आपली निवड कशापद्धतीने झाली नाही यावर गंभीर बोलला. आपलं म्हणणं मांडताना गंभीरने, "मी त्यावेळेस कदाचित 12 किंवा 13 वर्षांचा असेल ज्यावेळेस मी पहिल्यांदा 14 वर्षांखालील संघासाठी प्रयत्न केला होता. मात्र माझी निवड झाली नव्हते. यामागील कारण होतं की मी निवडकर्त्यांच्या पाया पडलो नव्हतो. तेव्हापासून मी स्वत:ला शब्द दिला की मी कोणाच्याही पायाशी वाकणार नाही. तसेच कोणालाही माझ्या पाया पडू देणार नाही," असं म्हटलं.

मला अनेकदा लोक सांगायचे की...

"मला आठवतंय की अगदी 16 वर्षांखालील स्पर्धा असो, 19 वर्षांखालील स्पर्धा असो किंवा रणजी ट्रॉफी असो किंवा अगदी अंतरराष्ट्रीय क्रिकेट असो जेव्हा जेव्हा मी माझ्या करिअरमध्ये अपयशी व्हायचो तेव्हा लोक मला म्हणायचे की तुला क्रिकेट खेळण्याची गरज नाही. तू तसाही फार सधन कुटुंबातून येतो. तुझ्याकडे फार पर्याय उपलब्ध आहेत. तू तुझ्या वडिलांच्या उद्योग व्यवसायामध्ये त्यांना हातभार लावू शकतोस, असं सांगायचे," अशी आठवण गंभीरने पुढे बोलताना सांगितली.

नक्की वाचा >> विराट 'ते' 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट! RCB च्या विजयामागील सिक्रेट उघड

मला कोणतेही विचार विचलित करत नव्हते कारण...

"लोकांना हे असं वाटायचं याचा मला त्रास व्हायचा. त्यांच्या मनातील याच भावनेला मला पराभूत करायचं होतं याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळेच मी जेव्हा त्यांच्या या विचारांना चुकीचं ठरवण्यात यशस्वी ठरलो तेव्हा इतर कोणतेही विचार मला विचलित करत नव्हते," असं गंभीर म्हणाला.

मेंटॉर म्हणून धडाकेबाज निर्णय अन् केकेआरचा फायदा

दोन वेळा केकेआरला आयपीएलचा चषक जिंकवून देणारा गंभीर यंदा संघांचा मेंटॉर आहे. गंभीरने मेंटॉर म्हणून संघाबरोबर काम करताना संघाच्या खेळात फारच सुधारणा दिसत आहे. गंभीरने संघासाठी काही असे धडाकेबाज निर्णय घेतले ही संघाची प्लेऑफपर्यंतची वाट सुखकर झाली. विशेष म्हणजे सुनील नरेन आणि फिल सॉल्टला सलामीवीर म्हणून पाठवण्याचा गंभीरचा निर्णय केकेआरच्या चांगलाच पथ्यावर पडला.