IPL 2024: राजकारणामुळे क्रिकेटपासून दूर गेलेले माजी क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतले आहेत. आयपीएलमध्ये ते पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहेत. आपला वेगळा अंदाज आणि शायरी यामुळे क्रिकेचाहत्यांना त्यांचं समालोचन फार भावतं. दरम्यान टी-20 मुळे फक्त भारतच नाही तर अनेक संघांना आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडताना मदत होणार आहे असं नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले आहेत. जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे.
"आयपीएलमुळे वर्ल्डकपसाठीचं वातावरण तयार होईल. सध्या इतर कोणतंही क्रिकेट खेळलं जात नाही आहे. जगाचं लक्ष आयपीएलवर आहे. येथे फक्त भारत नाही तर अनेक परदेशी खेळाडूंना टी-20 वर्ल्डकप संघात स्थान निश्चित करण्याची संधी आहे," असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुलाखतीत सांगितलं.
वर्ल्डकप संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही दिसण्याची शक्यता आहे. दोघांनीही 2022 टी-20 वर्ल्डकपपासून जास्त टी-20 खेळलेलं नाही. दरम्यान टी-20 संघात त्यांची भूमिका किती महत्वाची असेल? असं विचारण्यात आलं असता नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलं की, "त्यांची अद्यापही गरज असेल. ते क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी आहेत. फॉर्म हा पहाटेच्या दवाप्रमाणे आहे. पण त्यांचा क्लास महत्त्वाचा आहे".
"मी विराट कोहलीला सर्वात महान भारतीय खेळाडू मानतो. याचं कारण त्याचा फिटनेस आहे. वाढत्या वयासह त्याचा फिटनेसही चांगला होत आहे. तांत्रिकदृष्ट्या तो फार हुशार आहे आणि सर्व तिन्ही फॉर्ममध्ये परिस्थिती हातळण्याची कला आहे. रोहितबाबतही माझं हेच मत आहे," असं ते म्हणाले आहेत.
"रोहित आणि विराट दोघेही दर्जात्मक खेळाडू आहेत. रोहितच्या फिटनेसबद्दल मला खात्री आहे. वाढत्या वयासह तुमचा वेग कमी होतो. सेहवागला आयपीएलमध्ये पाहिलं तेव्हा त्याचा चष्मा बदलले होता. तो पूर्वीसारखा नव्हता," असं सिद्धूंनी सांगितलं. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ चांगला खेळला. फक्त एक वाईट सामना होता. पण एक वाईट सामना तुमचं नशीब ठरवू शकत नाही असं त्यानी म्हटलं.
पुढे ते म्हणाले की, "आमच्या काळात पर्याय उपलब्ध नसल्याने खेळाडू खराब फॉर्ममध्ये असतानाही त्याला खेळवलं जात होतं. पण आता वेळ बदलली आहे. आता हार्दिक पांड्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने तो भारतीय कर्णधाराची जागा घेतो. हा रोहितचा अपमान नाही, पण फक्त विचारांची प्रक्रिया आहे. जुन्याने नव्याला संधी दिली पाहिजे".
दरम्यान पुन्हा एकदा समालोचन करण्यावर सिद्धूने म्हटलं की, "क्रिकेट माझं पहिलं प्रेम आहे. जर तुमची आवडच तुमचा व्यवसाय, नोकरी असेल तर त्यापेक्षा उत्तम काही नाही. ज्याप्रमाणे मासा पाण्यात तरंगतो तशाप्रकारे मी समालोचन करेन".
दरम्यान आयुष्यातील चढ-उतारांवरही सिद्धू यांनी भाष्य केलं. राजकारणातून बाहेर पडणं माझ्यासाठी कठीण होतं, पण चमत्कार होतात असं ते म्हणाले. क्रिकेटमध्ये मिळणाऱ्या पैशांवरही त्यांनी भाष्य केलं. आपण कधीच पैशांचा विचार केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी क्रिकेट सोडल्यानंतर समालोचन करु लागलो तेव्हा हे करु शकेन की नाही याबद्दल आत्मविश्वास नव्हता. पण वर्ल्डकपच्या 10-15 दिवस आधी माझ्या नावाची चर्चा सुरु झाली. संपूर्ण स्पर्धेत 60 ते 70 लाख कमावण्यापासून ते मी आयपीएलमध्ये प्रत्येक दिवसाला 25 लाख कमावत होतो. पण ते समाधान पैशांमुळे नव्हतं असं ते म्हणाले.