IPL 2024: आयपीएल सामना सुरु असताना श्वानाला घातल्या लाथा; VIDEO पाहून सेलिब्रेटीही संतापले

IPL 2024: मुंबई आणि गुजरातमध्ये सामना सुरु असताना श्वानाने मैदानात प्रवेश केला होता. हार्दिक पांड्या यावेळी गोलंदाजीची तयारी करत होता. पण श्वानामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला.  

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2024, 01:08 PM IST
IPL 2024: आयपीएल सामना सुरु असताना श्वानाला घातल्या लाथा; VIDEO पाहून सेलिब्रेटीही संतापले title=

IPL 2024: रविवारी मुंबई आणि गुजरातमध्ये सामना सुरु असताना भटक्या श्वानाने मैदानात प्रवेश केल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. हार्दिक पांड्या यावेळी गोलंदाजीची तयारी करत होता. पण श्वानामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला. यानंतर त्याला मैदानातून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली होती. यावेळी काहींनी त्याला लाथ घालून अडवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

श्वान मैदानात घुसल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला त्याच्याकडे बोलावण्याचा प्रयत्न केला. पण श्वान दूर पळाल्यानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांनी मैदानात त्याचा पाठलाग केला. यावेळी काहींनी त्याला लाथही घातली. 

StreetdogsofBombay नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये श्वानाचा पाठलाग केल्यामुळे, लाथ मारल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे. "नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यात अस्वस्थ घटनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका असहाय्य श्वानाला लाथ मारताना आणि पाठलाग करताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यातून प्राण्यांच्या अत्याचाराचे दुर्दैवी वास्तव अधोरेखित होत आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण प्रेक्षकांची प्रतिक्रिया याहून अधिक धक्कादायक आहे, जे या हिंसाचाराचे साक्षीदार होते. त्यांनी फक्त फार मनोरंजक वाटलं. ते हसत होते आणि इमोजी लावून व्हिडीओ शेअर करत होते," अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवनचाही समावेश आहे. "श्वान म्हणजे काही फुटबॉल नाही. तो कोणालाही चावत किंवा त्रास देत नव्हता. अजून चांगला मार्ग होता," असं वरुण धवनने म्हटलं आहे, तर सिद्धार्थ कपूरने यामधून सध्याच्या डीएनएमध्ये असणारी माणुसकी दिसत आहे अशी कमेंट केली आहे. 

स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचा दावा करणाऱ्या एका युजरने लिहिले की, “मी स्टेडियममध्ये हे सर्व डोळ्याने पाहत होतो. अनेक लोक यावर मत मांडत आहेत. पण मला स्पष्ट करायचं आहे की, कुत्र्याने एकदा खेळात व्यत्यय आणला आणि नंतर तो बाहेर पडला . यानंतर त्याला मोकळेपणाने फिरू देण्यात आले. पुढच्या चेंडूवर तो पुन्हा आला आणि त्याने स्टेडियमला एक फेरी मारली. तो खेळण्यात आनंदी होता म्हणून सर्वांनी जाऊ दिले, पुढच्या चेंडूच्या आधी तो तिसऱ्यांदा आत आला. आणि आजूबाजूला फिरु लागला. खेळ सुरू करायचा होता म्हणून लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते त्याला सुरक्षा अडथळ्यांच्या बाहेर घेऊन जातील. पण तो खूप वेगवान होता. ग्राउंड स्टाफने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला".