Hardik Pandya IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी रिटेंशन नियमही (Retention Rules) समोर आले आहेत. एक संघ सहा खेळाडूंना रिटेन करु शकणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील सर्व दहा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरु, पंजाब किंग्स या संघांचे कर्णधारही बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यादरम्यान एका दिग्गज क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) मोठं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
हार्दिक पांड्याविरोधातील वक्तव्याने खळबळ
आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजीने कर्णधारपदावरुन रोहित शर्माची उचलबांगडी करत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला 18 कोटी रुपयांना ट्रेड केलं. इतकंच नाही तर त्याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुराही सोपवली. पण यावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू टॉम मूडीने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांच्या लायकीचा नाही, त्याऐवजी संघाने एखाद्या मॅचविनर खेळाडूवर बोली लावावी असं टॉम मूडी यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले टॉम मूडी?
मीडिया रिपोर्टनुसार आयपीएलमधील संघ 18-18 कोटींचे दोन खेळाडू, 14-14 कोटींचे दोन खेळाडू आणि 11-11 कोटींचे दोन खेळाडू रिटेन करु शकतात. या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना टॉम मूडी यांनी गेल्या हंगामातील खेळ पाहात जसप्रीम बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना 18 कोटी रुपयांत रिटेन करायला हवं, रोहितबद्दल काही सांगता येणार नाही असं म्हटलंय. तर या यादीत पांड्याचा समावेश होईल असं मला वाटत नसल्याचं मूडी यांनी सांगितलं.
हार्दिक पांड्याला 14 कोटी रुपये मिळू शकतात. ते पण त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर अवलंबून आहे. पण सर्व गोष्टींचा विचार करता हार्दिकवर 18 कोटी खर्च करण्याऐवजी एक चांगला मॅच विनर खेळाडू घेणं फायदेशीर ठरेल, असं मत टॉम मूडी यांनी व्यक्त केलंय.
आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन रोहित शर्माला हटवल्यानंतर मोठा वाद झाला होता. पण हार्दिक पांड्याबरोबरच मुंबई इंडियन्सची कामगिरीही या हंगामात निराशाजनक झाली होती. आता या हंगामात मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन हार्दिकची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा आहे.
हार्दिकची आयपीएल कारकिर्द
हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 137 सामने खेळले आहेत. यात त्याने 2525 धावा केल्यात तर 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याच्या नावावर 64 विकेटचा समावेश आहे.