राहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा

Indian Premier League 2025 : भारतीय क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफी जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडने आता आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. राहुल द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 10, 2024, 03:28 PM IST
राहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा title=

Indian Premier League 2025 : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सर्वात मोठा वाटा होता, तो माजी हेड कोच राहुल द्रविडचा (Rahul Dravid). संघाला एकसंध बांधून राहुल द्रविडने 125 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. 'मी आता बेरोजगार झालोय', असं राहुलचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. मात्र, आता राहुल द्रविड आता बेरोजगार राहिला नाहीये. तो राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा हेड कोच म्हणून नियुक्त झालाय. इतक्या संघांच्या ऑफर असताना देखील राहुल द्रविडने पुन्हा राजस्थान रॉयल्स संघामध्ये पुन्हा जाणं पसंत केलं. त्याचं कारण देखील रंजक आहे.

राहुल द्रविडचं करियर

तुम्हाला माहिती असेल तर, राहुल द्रविडने आपल्या आयपीएल करियरची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासोबत केली होती. राहुल द्रविडने आरसीबीसोबत तीन वर्ष होता. त्यानंतर द्रविड नव्या फ्रँचायझीसोबत जोडला गेला. त्यानंतर 2013 मध्ये जेव्हा द्रविडने निवृत्ती घेतली, त्यानंतर त्याने ब्रॉन्डकास्टिंगमध्ये आपलं करियर सुरू केलं. मात्र, तिथं कामात मजा येत असल्याचं लक्षात येताच, द्रविडने कोचिंग सुरू केली. तिथून द्रविडचा नवा प्रवास सुरू झाला. द्रविडने अंडर-19 संघाला कोचिंग दिली. त्यानंतर टीम ए संघासोबत तो जोडला गेला होता.

यशस्वी हेड कोच

राहुल द्रविडसाठी नवी आव्हानं उभी राहत होती. मात्र, त्यांनी आपल्या शांत स्वभावामुळे सर्व आव्हानं बाजूला केली. राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच झाला अन् दुसरीकडे कोहलीकडून रोहित शर्माच्या खांद्यावर संघाची जबाबदारी आली होती. वनडे वर्ल्ड कप आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर द्रविडने लक्ष केंद्रित केलं अन् यश देखील मिळवून दाखवलं. त्यानंतर कामात सातत्य राखण्यासाठी द्रविडने आयपीएलचा पर्याय आता निवडलाय.

पुन्हा हल्लाबोल...

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यशस्वी हेड कोच होता. त्यामुळे राहुल द्रविडला आपल्या फ्रँचायझीमध्ये सामील करावं, अशी सर्व फ्रँचायझींची इच्छा होती. मात्र, राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्सचा पसंती दिली. तसेच त्याने ब्लँक चेक देखील नाकारल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स संघाचीच निवड का केली? त्यासाठी आपल्याला 13 वर्ष मागे जावं लागेल...

झालं असं की, आयपीएलच्या सुरूवातीपासून राहुल द्रविड आरसीबीमध्ये होता. मात्र, 2011 मध्ये जेव्हा लिलाव झाला तेव्हा आरसीबीने राहुल द्रविडला नारळ दिला. त्यामुळे राहुल हताश देखील झाला होता. राहुल टेस्ट प्लेयर असल्याने तो टी-ट्वेंटीसाठी योग्य नाही, असं अनेकांचं मत होतं. मात्र, राजस्थानने राहुल द्रविडला संघात घेतलं. राहुलवर विश्वास देखील दाखवला. राहुल द्रविडच्या नेतृत्वात संघाने अनेक मोठे निर्णय घेतले अन् योग्य देखील ठरवले. त्यानंतर राजस्थान आणि राहुल द्रविडचे नातं घट्ट आहे. राजस्थानने दाखवलेल्या याच विश्वासाचे ऋष द्रविडने फेडले आहेत.