IPL Auction : आयपीएलचा नवा विक्रम, ४८ वर्षांच्या खेळाडूचा लिलाव

आयपीएलचा २०२० साठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. 

Updated: Dec 19, 2019, 10:38 PM IST
IPL Auction : आयपीएलचा नवा विक्रम, ४८ वर्षांच्या खेळाडूचा लिलाव title=

कोलकाता : आयपीएलचा २०२० साठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. नेहमीप्रमाणे या लिलावामध्येही खेळाडू मालामाल झाले. पण यंदाच्या मोसमात मात्र एक अनोखं रेकॉर्ड झालं आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच ४८व्या वर्षी एका खेळाडूचा लिलाव झाला आहे. मुंबईचा क्रिकेटपटू प्रविण तांबेला कोलकात्याने २० लाख रुपयांना विकत घेतलं आहे.

आयपीएलमध्ये खेळणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू असण्याचा विक्रमही प्रविण तांबेच्या नावावर आहे. ४१व्या वर्षी प्रविण तांबेने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. राहुल द्रविडच्या नेतृत्वात प्रविण तांबे राजस्थानकडून खेळला होता. यानंतर तो गुजरात आणि हैदरबादच्या टीममध्येही होता.

२०१३ साली तांबेने राजस्थानकडून ३ मॅच खेळल्या. २०१३-१४ सालच्या चॅम्पियन्स लीगमध्ये तांबेने ५ मॅचमध्ये १२ विकेट घेतल्या. त्या मोसमातला तांबे हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. आयपीएल २०१४ मध्ये तांबेने १३ मॅचमध्ये १५ विकेट पटकावल्या. २०१४ सालीच तांबेने कोलकात्याविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती.

२०१५ साली प्रविण तांबेने राजस्थानकडून १० मॅच खेळल्या आणि ७ विकेट घेतल्या. यानंतर राजस्थानचं २ वर्षांसाठी निलंबन झालं. त्यामुळे गुजरातने तांबेला विकत घेतलं. गुजरातकडून खेळताना सुरेश रैनाच्या नेतृत्वात तांबेने ७ मॅचमध्ये ५ विकेट घेतल्या. यानंतर तांबे हैदराबादच्या टीममध्ये गेला, पण हैदरबादने त्याला खेळवलं नाही.

प्रविण तांबे आबूधाबीमध्ये टी-१० लीगही खेळला आहे. या स्पर्धेत प्रविण तांबेने हॅट्रिकही घेतली आहे. या मॅचमध्ये तांबेने १५ रन देऊन ५ विकेट घेतल्या होत्या. टी-१० लीगमध्ये तांबेने ५ बॉलमध्येच ४ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये क्रिस गेल, इयन मॉर्गन, कायरन पोलार्ड आणि फॅबियन एलन यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

२०१३ साली आयपीएल खेळल्यानंतर तांबेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने मुंबईकडून २ प्रथम श्रेणी आणि ६ लिस्ट ए मॅच खेळल्या होत्या. 

आयपीएलचा लिलाव : हे खेळाडू झाले मालामाल