'राहुल द्रविडने जबाबदारी घ्यावी', एनसीएच्या कारभारावर बीसीसीआय नाराज

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला.

Updated: Mar 2, 2020, 07:57 PM IST
'राहुल द्रविडने जबाबदारी घ्यावी', एनसीएच्या कारभारावर बीसीसीआय नाराज

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने २ टेस्ट मॅचची ही सीरिज २-०ने गमावली. शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये फास्ट बॉलर ईशांत शर्माला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकला नाही. पण आता ईशांत शर्माच्या दुखापतीमुळे बीसीसीआय राहुल द्रविडवर नाराज झाल्याचं वृत्त आहे.

ऋद्धीमान सहा, भुवनेश्वर कुमार यांच्या दुखापतीमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली होती. आता ईशांत शर्माला पुन्हा दुखापत झाल्यामुळे एनसीएच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. एनसीएमधल्या घडामोडींची राहुल द्रविडने जबाबदारी घ्यावी, असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना केलं आहे.

'ईशांत शर्माला पुन्हा झालेल्या दुखापतीमुळे भारतीय खेळाडूंनी एनसीएबाबत घेतलेले आक्षेप पुन्हा समोर आले आहेत. ईशांत शर्माला फिट घोषित केलं तेव्हाचे स्कॅनिंग रिपोर्ट आणि आताचे स्कॅनिंग रिपोर्ट यामध्ये काय फरक आहे, हे पाहावं लागेल,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

'राहुल द्रविडचा खेळाडू म्हणून सन्मान आहे, पण प्रशासकीय जबाबदारी चालवणं कठीण आहे. क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक म्हणून द्रविडवर टीका करणं म्हणजे इश्वराची निंदा करण्यासारखं आहे. पण प्रशासकीय गोष्टी हाताळण्याबाबात द्रविडवर टीका होऊ शकते आणि त्याची छाननीही होऊ शकते,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली.

'ईशांत शर्मा हा आमचा प्रमुख बॉलर आहे. राहुल द्रविड एनसीएचा प्रमुख आहे, त्यामुळे द्रविडला जबाबदार धरणं नैसर्गिक आहे,' असं वक्तव्य बीसीसीआय अधिकाऱ्याने केलं. या अधिकाऱ्याने एनसीएमधले फिजिओ आशिष कौशिक वारंवार अपयशी ठरत असतानाही त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

'द्रविडने आशिष कौशिक यांना दिलेला पाठिंबा बघता त्यांनी या घोडचुकांची जबाबदारी घ्यायची वेळ आहे. एखाद्या वस्तूनिष्ठ आणि तटस्थ व्यक्तीची फिजिओ म्हणून निवड झाली तर चांगलं होईल,' असा सल्लाही बीसीसीआय अधिकाऱ्याने दिला आहे.

ऋद्धीमान सहा आणि भुवनेश्वर कुमार यांना फिट घोषित करण्यात आलं, पण यानंतर दोन्ही खेळाडूंच्या आधीच्याच दुखापतीने डोकं वर काढलं. मग एनसीएने नेमक्या कोणत्या टेस्ट घेऊन या दोघांना फिट असल्याचं सर्टिफिकेट दिलं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रकारानंतर जसप्रीत बुमराहने एनसीएमध्ये न जाता खासगी फिजिओकडून रिहॅबिलिटेशन करुन घेतलं. त्यामुळे नाराज झालेल्या एनसीएने बुमराहची फिटनेस टेस्ट घ्यायला नकार दिला होता.

'एनसीएच्या फिटनेस टेस्टचा खरंच काही अर्थ आहे का? बुमराहची फिटनेस टेस्ट एनसीएने घेतली नाही, तरी तो कोणत्याही अडचणीविना खेळत आहे. दुसरीकडे ईशांत शर्मा एनसीएची फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतरही दुखापतग्रस्त झाला आहे. बुमराहची फिटनेस टेस्ट घ्यायला नकार देणं धक्कादायक होतं. यामुळे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूची खरंच फिटनेस टेस्ट घेणं बंधनकारक आहे का? असा मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतो,' असं बीसीसीआय अधिकारी म्हणाला.

एनसीएने फिट असल्याचं सर्टिफिकेट दिल्यानंतर ईशांत शर्माने एनसीएचे फिजिओ आशिष कौशिक यांचे आभार मानले होते. सुरुवातीच्या स्कॅनिंग रिपोर्टनुसार ईशांत शर्माला दुखापतीतून बरं व्हायला निदान ६ आठवडे लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

ईशांतच्या दुखापतीवर टीम इंडियानेही मौन बाळगलं होतं. शुक्रवारी सराव करत असताना ईशांतने पाऊल दुखत असल्याचं सांगितलं. यानंतर मेडिकल टीम ईशांतला घेऊन स्कॅन करायला गेली. स्कॅनिंगचे रिपोर्ट आल्यानंतर ईशांत शर्मा दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं.

रणजी ट्रॉफीवेळी विदर्भाविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीकडून खेळत असताना ईशांत शर्माच्या उजव्या पावलाला दुखापत झाली होती. त्यावेळी दिल्ली डिसट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने ईशांतला फिट व्हायला ६ आठवड्यांचा वेळ लागेल, त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावं लागेल, असं सांगितलं होतं.