IND vs NZ: अय्यर की रहाणे; कर्णधार कोहली कोणाची जागा हिरावणार?

 कर्णधार विराट कोहलीही दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार आहे. अशा स्थितीत मुख्य फलंदाजांपैकी एकाला संघाबाहेर राहावं लागणार आहे.

Updated: Nov 30, 2021, 10:36 AM IST
IND vs NZ: अय्यर की रहाणे; कर्णधार कोहली कोणाची जागा हिरावणार?

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चुरशीच्या लढतीनंतर अनिर्णित राहिला. आता मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यावर संघाच्या नजरा असतील. संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीही दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार आहे. अशा स्थितीत मुख्य फलंदाजांपैकी एकाला संघाबाहेर राहावे लागणार आहे.

कोहलीच्या पुनरागमनासाठी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यात लढत होणार आहे. तर आता पुढील कसोटीत कोहलीची जागा कोण घेणार यावर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने मोठं विधान केलं आहे.

कोहली कोणाची जागा घेणार?

मुंबईतील पुढील कसोटीत कर्णधार विराट कोहली पुनरागमन करतोय अशात रहाणेला वगळार की श्रेयस अय्यर? यावर प्रशिक्षक राहुल द्रविडने उत्तर दिले की, "आम्ही आमचे शेवटचे 11 कसे असतील हे ठरवलेलं नाही आणि हे आताच सांगणं फार खूप घाईचं होईल."

राहुल द्रविड पुढे म्हणाले, "आम्ही मुंबईला गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर खेळाडूंचं फिटनेस तपासू. विराट कोहलीही सहभागी होणार असल्याने त्याच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल."

द्रविडने अंडर-19 क्रिकेट ते कसोटी क्रिकेट असा प्रवास करणाऱ्या अय्यरचे कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “तरुण खेळाडूंनी पदार्पणात चांगली कामगिरी करताना पाहणं चांगलं आहे. आम्ही टी-20 मध्ये काही खेळाडू पाहिले आहेत ज्यांनी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये छाप पाडली आहे.”

रहाणेसंदर्भात मोठं विधान

कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे स्वत: मोठी धावसंख्या करून आपली लय शोधण्याचा प्रयत्न करत असून ही केवळ एका डावाची बाब आहे, असं भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितलंय. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने न्यूझीलंडविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या कसोटीत 35 आणि 4 धावा केल्या. यावर्षी 12 कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 20 पेक्षा कमी आहे.

ते म्हणाले, "यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही. साहजिकच अजिंक्यने तुम्हाला वाटेल की त्याने अधिक धावा केल्या पाहिजेत. त्याला स्वतःलाही तेच करायला आवडेल. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने यापूर्वी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो अशा लोकांपैकी एक आहे ज्यांच्याकडे कौशल्य आणि अनुभव आहे. ही फक्त एका सामन्याची बाब आहे, त्याला ते माहित आहे आणि आम्हालाही ते समजलंय."