Thank You Jimmy : एका पर्वाचा अस्त! 40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा करणारी इंग्लंडची तोफ थंडावली

James Anderson Retirement : 21 वर्ष क्रिकेटची सेवा करून 188 कसोटी खेळणारा जेम्स अँडरसन अखेर निवृत्त झाला आहे. (England v West Indies)

सौरभ तळेकर | Updated: Jul 12, 2024, 06:33 PM IST
Thank You Jimmy : एका पर्वाचा अस्त! 40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा करणारी इंग्लंडची तोफ थंडावली title=
James Anderson Retirement

James Anderson : खूप कमी क्रिकेटर खूप वर्ष खेळतात पण खूप वर्ष खेळताना मॅचविनर होणं फारच कमी लोकांना जमतं. असाच एक अवलिया म्हणजे जेम्स अँडरसन. खेळाडू म्हणून उतरत्या वयात देखील तिच स्पीड अन् तिच अॅक्युरसी.. कसोटी क्रिकेटचा सर्वात घातक गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनकडे पाहिलं जात होतं. अशातच आता टेस्ट क्रिकेटचा हाच अवलिया आता निवृत्ती झालाय. क्रिकेट करियरमध्ये 40 हजाराहून अधिक बॉलचा मारा करत अँडरसनने 704 विकेट्स नावावर केल्या. आता 21 वर्षांपासून धावत असलेली इंग्लंडची तोफ थंडावली.

अखेरच्या टेस्ट सामन्यात देखील अँडरसन इतिहास रचून गेला. टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज असलेला अँडरसन या फॉरमॅटमध्ये 40 हजार चेंडू टाकणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच अँडरसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 950+ विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. अखेरच्या सामन्यातून बाहेर पडताना अँडरसन भावूक झाल्याचं पहायला मिळालं. कधीतरी थांबायचंय, याचा विचार करून अँडरसनने प्रथम संघाचा विचार केला अन् टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला.

दरम्यान, वय वर्ष 43 असताना देखील अँडरसनच्या विकेट्स भूक कधी कमी झाली नाही. इंग्लंड असो वा वेस्ट इंडिज, कोणत्याही मैदानात अँडरची स्पीड काही कमी झाली नाही. ना कधी थकला ना थांबला. धावत राहिला अन् खोऱ्याने विकेट्स नावावर करत गेला. ढेरी घेऊन फिरणाऱ्या विशीतल्या तरुणाला देखील लाजवेल, अशी अँडरसनची फिटनेस.. अनेक खेळाडू चाळीशीत आले की पायाला पट्टया लावून फिरतात. मात्र, रखरखत्या उन्हात फलंदाजांचे दांडके मोडण्याची ताकद आहे ती फक्त जेम्स अँडरसनकडेच..!