ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे. 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होत असून, पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान याआधी जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये Goat इतकंच लिहिलं आहे. Goat याचा अर्थ The Greatest of All Time म्हणजेच सर्वकालीन श्रेष्ठ असा आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज अशी ओळख असणाऱ्या डेल स्टेनने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेती. बुमराह आणि डेल स्टेन आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत. पण त्यांनी कधीही ड्रेसिंग रुम शेअर केलेली नाही.
बुमराह ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित असणार आहे. त्याच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
"रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं आम्ही वाचत आहोत. कदाचित तो दुसरा कसोटी सामनाही खेळणार नाही. जर असं असेल तर मी आताच सांगतोय की, भारतीय निवड समितीने त्याला सांगावं, 'जर तुला आराम करायचा असेल तर आराम कर. जर वैयक्तिक कारणं असतील तर त्यात लक्ष घाल. पण जर तू दोन-तीन सामने गमावणार असशील तर मग या दौऱ्यात फक्त एक खेळाडू म्हणून जा. आम्ही तुला या दौऱ्यात उप-कर्णधार करु'", असं सुनील गावसकर 'स्पोर्ट्स तक'शी संवाद साधताना सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "भारतीय क्रिकेट सर्वात महत्त्वाचं आहे. जर आपण न्यूझीलंडविरोधातील मालिका 3-0 ने जिंकलो असतो तर गोष्ट वेगळी होती. पण आपण 0-3 ने मालिका गमावली असल्याने आता नव्या कर्णधाराची गरज आहे. जर सुरुवातीलाच कर्णधार नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी कर्णधार करणं जास्त चांगलं होईल".
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच मात्र सुनील गावसकर यांच्या मताशी सहमत नाही. त्याने म्हटलं आहे की, "मी पूर्णपणे सुनील गासवकर यांच्याशी असहमत आहे. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. जर तुमच्या पत्नीला बाळ होणार असेल आणि त्यासाठी विश्रांती घेत असाल तर हा फार सुंदर क्षण आहे. तुम्ही यासाठी हवा तितका वेळ घेऊ शकता".