झुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

६८ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये घेतल्या ५६ विकेट

Updated: Aug 25, 2018, 04:52 PM IST
झुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती title=

मुंबई : भारतीय महिला टीमची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून संन्यास घ्यायची घोषणा केली आहे. त्यामुळे झुलन गोस्वामी आता नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. झुलन गोस्वामीनं ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ४.४५ च्या इकोनॉमी रेटनं ५६ विकेट घेतल्या आहेत. ३५ वर्षांची झुलन गोस्वामी आता फक्त वनडेमध्ये खेळणार आहे. झुलननं वनडेमध्ये १६९ मॅचमध्ये २०० विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये एवढ्या विकेट घेणारी झुलन जगातली पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

निवृत्तीचा निर्णय एका रात्री घेतलेला नाही. बऱ्याच कालावधीपासून याबाबत विचार करत होते. खेळ खूप जलद झाला आहे आणि मी धीमी झाली आहे. माझं वय होत आहे, अशी प्रतिक्रिया झुलननं दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून झुलनला टी-२०मध्ये विकेट मिळत नव्हत्या, म्हणून तिच्यावर टीकाही होत होती. आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्ध फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. तसंच या स्पर्धेत आधीही बांगलादेशनं भारताला हरवलं होतं. आशिया कपमध्ये झुलननं ४ मॅचमध्ये फक्त एकच विकेट घेतली होती.

निवृत्ती घेतल्यानंतर झुलननं बीसीसीआय आणि टीममधल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भाग घेता येणार नाही याचं दु:ख होतंय का, असा सवाल झुलनला विचारण्यात आला. पण याचं दु:ख व्यक्त करण्याची ही वेळ नाही. मला वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावं लागेल, अशी प्रतिक्रिया झुलननं दिली आहे. तसंच निवृत्तीसाठी कोणाकडूनही दबाव आला नाही, असं स्पष्टीकरण झुलननं दिलं आहे.

नेमकं काय झालं याचा खुलासा मी करणार नाही, पण आशिया कपनंतर ही गोष्ट माझ्या डोक्यात होती. क्रिकेट आता कठीण झालं आहे आणि माझं शरीर आता साथ देत नाही हे माझ्या लक्षात आल्याचं झुलन म्हणाली.