'...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक

Rohit Sharma:  या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 13, 2024, 01:01 PM IST
 '...अशाने टीम इंडिया सामना गमावेल', रोहित शर्मा करतोय पुन्हा 'तिच' चूक title=

Kapil Dev on Rohit Sharma: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली झाली आहे. लीग स्टेजमध्ये भारताने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला आहे. या तीन सामन्यातील विजयामुळे भारताला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळाला आहे. बुधवारी टीम इंडियाचा सामना अमेरिकेशी झाला. या सामन्यात भारताने अमेकिरेचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक होतंय. मात्र टीमचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात एक चूक केल्याचं ऑलराऊंडर कपिल देव यांचं म्हणणं आहे. 

वर्ल्ड कपमधील दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो होता जसप्रीत बुमराह. या महान भारतीय वेगवान गोलंदाजाने प्रथम आयर्लंडविरुद्ध 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध त्याने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची सर्वात मोठी विकेट घेत टीम इंडियाला चांगली सुरुवात करू दिली. या दोन्ही सामन्यांमध्ये बुमराहने उत्तम कामगिरी करत विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. 

कोणत्या गोष्टीवर नाराज आहेत कपिल देव?

गेल्या 2 सामन्यांमध्ये बुमराहची कामगिरी चांगली असूनही त्याचा सामन्यातील वापरावर प्रश्न उपस्थित केले जातायत. भारताच्या माजी कर्णधाराने रोहित शर्माच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केला असून बुमराहला गोलंदाजीची ओपनिंग का दिली जात नाही असा सवाल केला आहे. कपिलने एका टीव्ही शोदरम्यान सांगितलं की, बुमराह विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याने पहिली ओव्हर टाकली पाहिजे. जर बुमराहला चौथ्या-पाचव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला लावली तर तोपर्यंत सामना हाताबाहेर जाईल.

बुमराहला कधी दिली गेली गोलंदाजी?

या वर्ल्डकपच्या दोन सामन्यांमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टीम इंडियासाठी गोलंदाजीची सुरुवात केली. यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नवीन बॉलने दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आला. आयर्लंडविरुद्ध, बुमराहला सहाव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी दिली. तर पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजी करण्यासाठी आणलं. याशिवाय अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात देखील जसप्रीत बुमराहला पाचवी ओव्हर देण्यात आली होती. 

यावेळी कॉमेंट्रीदरम्यान माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं होतं. टीम इंडिया केवळ 119 रन्स डिफेंस करत असताना हा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.