बैतूल : खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायची सरकारची निती आणि दावे किती पोकळ असतात, हे मध्य प्रदेशच्या प्रियंका चोपडेकडे बघून लक्षात येईल. कराटेमध्ये चीन आणि ब्राझीलच्या खेळाडूंना लोळवणाऱ्या प्रियंकाला मागची २ वर्ष आपलं खेळाचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. कराटेमध्ये प्रियंकाने चीन आणि ब्राझीलच्या खेळाडूंना मात देऊन सुवर्णपदक पटकावलं होतं. प्रियंकाचे वडिल ओमकार चोपडे मजुरी करुन कुटुंबाचं पालनपोषण करतात.
प्रियंकाला सर्टिफिकेट मिळत नसल्यामुळे तिची अकादमीमध्ये अॅडमिशनही होत नाहीये. प्रियंकाने २ वर्षआधी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ब्राझील आणि चीनच्या खेळाडूंना मात दिली होती. खेळ आणि युवा कल्याण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेवेळी प्रियंका ९वी मध्ये शिकत होती. आंतरराष्ट्रीय खेळ महासंघाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पण महासंघाने अजूनही प्रियंकाला या पदकाचं सर्टिफिकेट दिलं नाही.
सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे प्रियंकाला खेळाच्या कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाही. तसंच तिची कराटे अकादमीमध्येही अॅडमिशन होत नाही. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी महासंघ आणि शिक्षा विभाग मदत करत नसल्याचा आरोप प्रियंकाच्या वडिलांनी केला आहे. मंत्र्यापासून कलेक्टरपर्यंत सगळ्यांकडे विनंती केल्यानंतरही सर्टिफिकेट मिळत नसल्याने प्रियंकाच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा पंचायत बैतूलचे सीईओ आणि अपर संचालक शिक्षा एमएल त्यागी यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे.