World Cup पूर्वी खलिस्तान्यांचं मोठं कारस्थान; धरमशालामध्ये भर चौकात दिला 'हा' इशारा

Khalistan slogans in Dharamshala: वर्ल्डकपच्या सामन्यांवर खलिस्तानी वक्रदृष्टी असल्याचं दिसून येतंय. हिमाचल प्रदेशातील धरमशालामध्ये शनिवारी बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी खलिस्तानी कारस्थान उघडकीस आलंय.

सुरभि जगदीश | Updated: Oct 5, 2023, 07:42 AM IST
World Cup पूर्वी खलिस्तान्यांचं मोठं कारस्थान; धरमशालामध्ये भर चौकात दिला 'हा' इशारा title=

Khalistan slogans in Dharamshala: आजपासून भारतात वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्या मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र यापूर्वी वर्ल्डकपच्या सामन्यांवर खलिस्तानी वक्रदृष्टी असल्याचं दिसून येतंय. हिमाचल प्रदेशातील धरमशालामध्ये शनिवारी बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी खलिस्तानी कारस्थान उघडकीस आलंय.

वर्ल्डकपच्या सामन्यापूर्वी धरमशाळेतील सरकारी इमारतीच्या भिंतींवर खलिस्तान जिंदाबादचे नारे लिहिण्यात आलेत. वर्ल्डकप सामन्यांच्या दरम्यान अशा घटनांमुळे परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

स्प्रे पेंटने लिहिले गेले खलिस्तानी जिंदाबादचे नारे

मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी धर्मशाळेतील सरकारी विभागाच्या भिंतीवर स्प्रे पेंटने खलिस्तान जिंदाबाद लिहिलंय. मात्र या घटनेनंतर पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करत हे लिहिलेले नारे मिटवण्यात आले आहेत. मात्र तरी देखील काही प्रमाणात हे नारे भिंतींवर दिसून येतायत. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जलशक्ती विभागाच्या कार्यालयाच्या भिंतीवर खलिस्तान जिंदाबादचा नारा लिहिण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. काळ्या स्प्रे पेंटने ही घोषणा लिहिण्यात आली आहे. स्थानिक व्यक्तीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती. यावेळी या घटनेबाबत आयपीएच विभागाचे चौकीदार अश्वनी कुमार रात्री त्याच इमारतीत उपस्थित होते. त्यांच्या सांगण्यानुसार, हा प्रकार घडला तेव्हा ते इमारतीच्या आत होते बाहेर नाही. याप्रकरणी पोलिसांनी अश्वनी कुमारची चौकशी केलीये.

1500 पोलीस आणि होमगार्डचे जवान तैनात 

धर्मशालामध्ये होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये सामन्यांसाठी जिल्हा पोलीस सज्ज झाले आहेत. सुरक्षेसाठी 1500 पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. शहराबाहेरही पाळत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत. 

एसपी कांगडा शालिनी अग्रीहोत्री यांनी माहिती दिली की, सामन्यांच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विविध गेटवर विशेष तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. जेणेकरून सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची, विशेषत: महिलांची आणि सुरक्षेची काळजी घेतली जाईल.