पंजाब : आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. याआधीच पंजाब टीमने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यापैकी ५ शहीद जवान हे हिमाचल आणि पंजाबमधील होते. या भागातील शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब टीमचा कर्णधार रविचंद्रन आश्विन आणि सीआरपीएफचे उप महानिरीक्षक वीके कौंदल यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्त करण्यात आले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जयमल सिंह, सुखजिंदर सिंह, मनिंदर सिंह, कुलविंदर सिंह आणि तिलक राज या जवानांना वीरमरण आले होते. हे शहिद जवान पंजाब-हरियाणा राज्यातले आहेत.
याआधी बीसीसीआयच्या वतीने शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सैन्य दलाच्या सहाय्यता निधी आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या सहाय्यता निधीसाठी २० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या पहिल्याच्य दिवशी म्हणजेच २३ मार्चला भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे. यांच्या उपस्थितीत ही रक्कम देण्यात येणार आहे.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे उद्घाटन थाटात न करता, ही रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्याचं ठरवलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे चहुबाजूंनी स्वागत केले गेले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २३ तारखेपासून सुरुवात होत असून पहिली मॅच गतविजेती चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात खेळली जाणार आहे. प्रशासकीय समितीने सेना सहाय्यता निधीसाठी २० कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.