पुनरागमनाच्या मॅचमध्ये केएल राहुल अपयशी

निलंबनाच्या कारवाईनंतर केएल राहुल यानं पुन्हा पुनरागमन केलं आहे.

Updated: Jan 28, 2019, 09:00 PM IST
पुनरागमनाच्या मॅचमध्ये केएल राहुल अपयशी title=

तिरुवनंतपूरम : निलंबनाच्या कारवाईनंतर केएल राहुल यानं पुन्हा पुनरागमन केलं आहे. पण पुनरागमनाच्या मॅचमध्ये केएल राहुल पुन्हा अपयशी ठरला आहे. तिरुवनंतपूरममध्ये भारत ए आणि इंग्लंड लायन्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये केएल राहुल २५ बॉलमध्ये १३ रन करून आऊट झाला. केएल राहुल अजिंक्य रहाणेसोबत सलामीला बॅटिंगला आला होता. सुरुवातीलाच राहुलनं २ फोर मारल्या. पण फास्ट बॉलर जिमी ओव्हरटननं राहुलला माघारी पाठवलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या भारतानं इंग्लंडला विजयासाठी १७३ धावांचं आव्हान दिलं होतं. दीपक चहरनं ३९ रन आणि इशान किशननं ३० रन केल्या.

या मॅचमध्ये भारत ए टीमचा ६० रननी विजय झाला. इंग्लंड लायन्सच्या टीमला भारताच्या बॉलरनी वारंवार झटके दिले, त्यामुळे इंग्लंड लायन्सच्या टीमचा ३०.५ ओव्हरमध्ये ११२ रनवर ऑल आऊट झाला.

निलंबनानंतर पुनरागमन करणारा केएल राहुल एकीकडे अपयशी ठरलेला असताना हार्दिक पांड्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये शानदार कामगिरी केली. पांड्यानं १० ओव्हरमध्ये ४५ रन देऊन २ विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचा उत्कृष्ट कॅचही पकडला. भारतानं तिसरी वनडे ७ विकेटनं जिंकल्यामुळे पांड्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही. भारत आणि न्यूझीलंडमधली चौथी वनडे ३१ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. शेवटच्या दोन वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्याऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व असेल.

'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं दोन्ही खेळाडूंचं निलंबन केलं होतं. अखेर या दोन्ही खेळाडूंवरची बंदी मागे घेण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आणि दोन्ही खेळाडूंचा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.