'मानसिकदृष्ट्या इतकं...', संघातील फलंदाजीचा क्रमांक सतत बदलला जाण्यावर के एल राहुल स्पष्टच बोलला, 'मला संघात...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघात परतला असल्याने के एल राहुलचं प्लेईंग 11 मधील स्थान पुन्हा अनिश्चित झालं आहे. यादरम्यान के एल राहुलने वेगवेगळ्या क्रमांकावर खेळताना सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक आव्हानांवर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 4, 2024, 03:09 PM IST
'मानसिकदृष्ट्या इतकं...', संघातील फलंदाजीचा क्रमांक सतत बदलला जाण्यावर के एल राहुल स्पष्टच बोलला, 'मला संघात...' title=

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती घेणारा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा संघात परतला आहे. यामुळे के एल राहुलचं स्थान पुन्हा अनिश्चित झालं आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिल्या कसोटी सामन्यात के एल राहुल यशस्वी जैसवालसह ओपनिंगला आला होता. पण आता रोहित शर्मा आल्याने तो चौथ्या किंवा अन्य क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान फलंदाजीचा क्रमांक सतत बदलत असल्याने सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक आव्हानांवर के एल राहुलने भाष्य केलं आहे. आपण आता कोणतीही भूमिका साकारण्यात सहज असल्याचं त्याने सांगितलं आहे. 

शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. यानिमित्ताने के एल राहुलने अॅडलेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी के एल राहुलने सांगितलं की, आपण जेव्हा कधी नव्या क्रमांकावर खेळतो तेव्हा पहिले 20 ते 25 चेंडू खेळणं आव्हानात्मक असतं. 

“मी अनेक क्रमांकावर फलंदाजी केली आहे. याआधी पहिले 20-25 चेंडू कसे खेळायचे हे तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या थोडे आव्हानत्मक असायचं,” असं तो म्हणाला. “मी किती लवकर आक्रमक खेळी करु शकतो? मला किती सावध राहण्याची गरज आहे? या अशा अशा गोष्टी होत्या ज्या सुरुवातीला अवघड होत्या. पण आता मी सर्वत्र कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलो आहे, त्यामुळे मला माझा डाव कसा सांभाळायचा आहे याची कल्पना आली आहे,” असं त्याने सांगितलं आहे. 

एका दशकापूर्वी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करणारा राहुल पहिल्या कसोटीत सलामीवीर म्हणून आला. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 26 आणि 77 धावा केल्या. रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे त्याने यशस्वी जैस्वालसह चांगली भागिदारी केली. पण दुसऱ्या कसोटीसाठी कर्णधार परतणार असल्याने राहुलचा फलंदाजी क्रमांक पुन्हा बदलणार आहे. 

त्याला त्याच्या पसंतीच्या स्थानाबद्दल विचारलं असता तो म्हणाला: “काहीही (ओपनिंग किंवा मिडल ऑर्डर) चालेल. मला फक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये राहायचे आहे, याचा अर्थ कुठेही. तुम्ही तिथे जा आणि फलंदाजी करा आणि संघासाठी खेळा.”

के एल राहुलने सांगितलं की, त्याने आपला दृष्टीकोन सोपा केला आहे आणि आता त्याच्या डावाच्या सुरुवातीला 30-40 चेंडू खेळून ती सोपी करतो. “मी अव्वल क्रमांकावर फलंदाजी करत असलो की मधल्या फळीत. जर मी सुरुवातीला पहिले 30-40 चेंडू सांभाळू शकलो, तर सर्वकाही नियमित फलंदाजीसारखे दिसते. यावरच मी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो,” असं त्याने स्पष्ट केलं.