कोलकाता : आयपीएलच्या ११व्या हंगामात फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात चुरस रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यात फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील. आज जो संघ जिंकणार आहे त्याचा सामना धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईसंघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. कोलकातामध्ये पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. गेल्या साममन्यात पावसाबाबत अलर्ट व्यक्त करण्यात आला होता. मात्र दिवसा पाऊस झाल्याने त्याचा तितका परिणाम सामन्यावर झाला नाही.
मात्र आज कोलकातामध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच जर संध्याकाळी पाऊस झाला तर सामना रद्द होऊ शकतो. सामना रद्द झाल्यास याचा सरळ फायदा हैदराबादला होईल आणि ते फायनलमध्ये प्रवेश करतील, साखळी सामन्यांमध्ये हैदराबाद १४ सामन्यांनंतर अव्वल स्थानावर होता. मात्र या संघाला अखेरच्या चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाताने गेल्या सलग चार सामन्यांत विजय मिळवलाय. यात दुसऱ्या क्वालिफायरमधील राजस्थानविरुद्धच्या विजयाचाही समावेश आहे. मुंबईविरुद्ध १०२ धावांनी मानहानीकारक पराभव झाल्यानंतर कोलकाताने मागे वळून पाहिले नाही.