कृणालचं कौतुक; पण अर्षदीपच्या कृत्यावर टीका

सलग 3 सामने गमावल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सला सूर गवसला.

Updated: Sep 29, 2021, 09:35 AM IST
कृणालचं कौतुक; पण अर्षदीपच्या कृत्यावर टीका title=

दुबई : सलग 3 सामने गमावल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सला सूर गवसला. कालच्या सामन्यात 6 विकेट्सने मुंबईने पंजाबवर विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यामध्ये कृणाल पंड्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र दुसरीकडे पंजाब किंग्सच्या अर्षदीप सिंगने केलेल्या कृत्यावर अनेकजणं टीका करत आहेत. 

झालं असं की पंजाब किंग्ज गोलंदाजी करत असताना 12 वी ओव्हर अर्षदीप सिंग करत होता. यावेळी सौरभ तिवारी बँटींग करत होता. ओव्हरचा चौथा बॉल सौरभने मारला आणि तो अर्षदीपच्या हातात गेला. यावेळी अर्षदीपने बॉल सौरभच्या दिशेने मारला आणि त्याला तो चुकीच्या ठिकाणी लागला. 

दरम्यान अर्षदीपकडे बॉल मारल्यानंतर सौरभने त्याला हाताने थांब असा इशाराही दिला होता. मात्र तरीही अर्षदीपने बॉल सौरभकडे भिरकावला. सौरभला बॉल जोरात लागला. सौरभ वेदनेने इतका कळवळला की तो मैदानावर काहीकाळ झोपला. 

तर दुसरीकडे कृणाल पंड्याने मात्र या सामन्यात खिलाडूवृत्ती दाखवली. बोलिंग करताना कृणालने चेंडू टाकला. गेलने तो चेंडू केएलच्या दिशेने मारला. गेलने मारलेला फटका केएलला लागून कृणालच्या दिशेने गेला. तेवढ्यात नॉन स्ट्राईक एंडवर असलेला केएल क्रीझच्या बाहेर गेला होता. केएल फिरून क्रीझच्या आत येण्याआधीच कृणालने बॉल थ्रो करत केएलला रनआऊट केलं. 

हा सर्व प्रकार इतक्या लवकर घडला की केएल आऊट आहे की नॉट आऊट आहे, हे अंपायरलाही समजलं नाही. कृणालनेही आग्रहीपणे अंपायरकडे अपील केली. फिल्ड अंपायरने थर्ड अंपायरची मदत घेतली. मात्र तितक्यात केएलसोबत नक्की काय झालं हे कृणालला समजलं. केएल आऊट होता. मात्र त्यानंतरही कृणालने तितक्याच आग्रहीपणे त्याने केलेली अपील फेटाळली.