AUS vs SL: 16 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपमधील सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने 5 विकेट्सने विजय मिळवला. यंदाच्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय होता. तर श्रीलंकेचा या स्पर्धेमध्ये सलग तिसरा पराभव झाला आहे. वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुना शनाका गुडघ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत कुशल मेंडिसकडे टीमच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलीये. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर मेंडिसने सलग तिसऱ्या पराभवावर प्रतिक्रिया दिलीये.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झालेल्या पराभवानंतर कुसल मेंडिसने स्वत:च्याच खेळाडूंवर ताशेरे ओढले आहेत. सामन्यातनंतर कुशल मेंडिसने सांगितलं की, “निसांका आणि परेराने चांगली फलंदाजी केली. त्यानंतर आम्हाला संघर्ष करावा लागला. त्यामुळे आमचा स्कोर कमी झाला. या सामन्यात 290 किंवा 300 ही चांगली धावसंख्या ठरली असती.
आम्हाला स्ट्राईक फारसा फिरवता आला नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही चांगली फलंदाजी केली. आज फलंदाजांना संघर्ष करावा लागला. मला माझ्या फलंदाजीवर विश्वास आहे. या सामन्यात मधुशंकाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली, असंही मेंडिसने सांगितलंय.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावून 209 रन्स केले. श्रीलंकेच्या टीमकडून ओपनर पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी शानदार फलंदाजी केली. यावेळी निसांकाने 61 रन्स केले. तर परेराने 78 रन्सची खेळी केली. याशिवाय श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने काही काळ सामना थांबवण्यात आला होता. दुसरीकडे 210 धावांचा पाठलाग करता ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने 52 रन्स तर जोस इंग्लिसने अर्धशतक झळकावत टीमला विजय मिळवून दिला.
2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी खराब राहिली आहे. श्रीलंकेने आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता आणि या सामन्यात त्यांना 102 रन्सने पराभव स्विकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात लंकेला पाकिस्तानकडून 6 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.