मुंबई : आयपीएल २०१८ साठी नुकतचं लिलाव प्रक्रिया पार पडली. यंदाच्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना कुठल्याच टीमने खरेदी केलं नसल्याचं पहायला मिळालं. यापैकीच एक खेळाडू म्हणजे लसीथ मलिंगा...
श्रीलंकेचा स्टार बॉलर असलेल्या लसीथ मलिंगाला यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये घेतलं होतं. मुंबई इंडियन्सने IPLमध्ये मिळवलेल्या विजयात मलिंगाचं मोठं योगदान होतं. मात्र, यंदाच्या लिलावात मलिंगाला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.
कुठल्याच टीमने विकत न घेतलेला लसीथ मलिंगा श्रीलंकन क्रिकेट टीममधूनही बाहेर आहे. श्रीलंकेचा हा स्टार क्रिकेटर आता क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरोधात झालेल्या त्रिकोणीय सीरिजमध्येही मलिंगाची निवड केली नाही.
संडे टाईम्ससोबत बोलताना मलिंगाने म्हटलं की, "जर एक प्लेअर म्हणून टीमला माझी गरज नाहीये तर पुढे जाण्याची ही योग्य वेळ आहे. मी आणखीन काही वर्षे क्रिकेट खेळु शकतो. जर टीममधील एक प्लेअर म्हणून खेळु शकत नाही तर मार्गदर्शक म्हणून पुढील वर्ल्डकपसाठी टीमसोबत काम करण्यास तयार आहे."
आयपीएल-११ च्या लिलावात लसीथ मलिंगाला कुठल्याच टीमने खरेदी केलं नाही. गेल्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या मलिंगाचं प्रदर्शन खूपच निराशाजनक राहीलं होतं. ३४ वर्षीय मलिंगा २०१७ मधील सप्टेंबर महिन्यात शेवटचा मैदानात उतरला होता.
मलिंगाने श्रीलंकेसाठी खेळताना ३० टेस्ट, २०४ वन-डे आणि ६८ टी-२० मॅचेस खेळल्या आहेत. मलिंगाने टेस्ट क्रिकेटमध्ये १०१ विकेट्स घेतले आहेत. वन-डेमध्ये ३०१ विकेट्स घेतले आहेत तर टी-२० क्रिकेटमध्ये ९० विकेट्स घेतले आहेत.