मुंबई : बुधवारपासून सुरू होत असलेल्या विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलामीवीर ऋतुराज गायकवाड नवी जबाबदारी स्वीकारणार आहे. या स्पर्धेत 20 सदस्यीय महाराष्ट्र संघाचे कर्णधार ऋतुराजकडे असणार आहे. 24 वर्षीय ऋतुराज इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. विशेष म्हणजे पुढील हंगामासाठीही त्याला या फ्रँचायझीने कायम ठेवलं आहे.
आता महाराष्ट्र राज्याच्या निवड समितीने ऋतुराज गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवला असून त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवलं आहे. त्याचप्रमाणे राहुल त्रिपाठीची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघ विजय हजारे करंडक स्पर्धेच्या गट-ड मध्ये आहे, ज्यांचे सामने राजकोटमध्ये खेळले जातील. या गटात मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तराखंड आणि चंदीगडचे संघही आहेत. बुधवारी महाराष्ट्राचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध होणार आहे.
ऋतुराजला आयपीएलच्या पुढील सीझनपूर्वी 6 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) सोबत ज्या 4 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे त्यात ऋतुराजचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनाही कायम ठेवण्यात आलं आहे. ऋतुराजने नुकतंच श्रीलंकेविरुद्धच्या T20 मधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उप कर्णधार), यश नाहर, नौशाद शेख, अजीम काजी, अंकित बावने, शमशुजामा काजी, मुकेश चौधरी, प्रदीप दाधे, मनोज इंगले, आशा पालकर, दिव्यांग हिंगानेकर, जगदीश जोप, स्वप्निल फुलपागर, अवधूत दांडेकर, तरणजीत सिंह ढिल्लों, सिद्धेश वीर, यश क्षीरसागर, पवन शाह आणि धनराज परदेशी